क्रेडिट कार्डद्वारे सोळा हजार रूपये हडप
प्रतिनिधी / मिरज
कोरोना इन्श्युरन्ससाठी क्रेडीट कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे आहे, असे सांगून त्याचा ओटीपी नंबर माहिती करून घेऊन ऑनलाईन बँकिंगद्वारे शहरातील एका तरूणाला १६ हजार ६६५ रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल दिलीप सन्मुख (वय ४२, रा. शिवाजी क्रीडांगणासमोर, मिरज) यांनी शहर पोलिसांत अज्ञात महिलेविरोधात फिर्याद दिली आहे.
सन्मुख यांना गेल्या आठवठ्यात एका अज्ञात महिलेचा फोन आला. तिने बजाज प्लॅटिनम क्रेडिट कार्ड मिळाले आहे का ? याची चौकशी केली. सदर कार्डची माहिती तिने विचारून घेत कार्डची व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओटीपी पाठवत असल्याचे सांगितले. तो सन्मुख यांना परत विचारून घेतला. त्यानंतर कोविडसाठी इन्श्युरन्स करणे आवश्यक आहे, असे सांगून पुन्हा सहा अंकी ओटीपी नंबर पाठविला. इन्श्युरन्स नको असल्यास तो कॅन्सल करण्यासाठी पाठविलेला ओटीपी नंबर आवश्यक आहे, असे सांगत तो नंबर विचारून घेतला. त्यानंतर सन्मुख यांना क्रेडीट कार्डवरून १६ हजार ६६५ रूपये खर्च झाल्याचा मेसेज आला. ज्या महिलेने फोन केला होता तिच्या मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, तो बंद होता. सन्मुख यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत बँकेत चौकशी केली असता, अशा पध्दतीने कुठलाच फोन केल्याचे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सन्मुख यांनी मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.