आमदार सुदिन ढवळीकर यांचा आरोप
वार्ताहर / मडकई
कोविड इस्पितळाला आमचा विरोध नसून उलट, त्यासाठी आम्ही सहकार्यच करु. जनतेच्या हितासाठी आत्तापर्यंत आम्ही सहकार्यच करीत आलो आहोत. मात्र कुठलीच पूर्वकल्पना न देता व वैद्यकीय नियम धाब्यावर बसवून फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करणे हे न्यायाला धरुन नाही, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
गरोदर महिला व शस्त्रक्रिया केलेल्या इतर रुग्णांना रात्रीच्यावेळी इस्पितळ सोडण्याचा व त्यांच्याकडून तसे लिहून घेण्याची कृती ही कुठल्याही वैद्यकीय शास्त्रात बसत नाही. कोविड इस्पितळ उभारताना पर्यायी सोय म्हणून आयडी इस्पितळाचेयोग्य व रुग्णाला सोयिस्कर ठरेल अशा जागीच स्थलांतर करावे, अशी मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील एका भाजपा कार्यकर्त्यांने या मुद्दय़ावर आपल्यावर टिका करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती जाणू घ्यावी. आयडी इस्पितळाचे स्थलांतर फर्मागुडीच्या दिलासा इस्पितळात करावी ही सरकारला केलेली आपलीच सूचना होती. कुठल्याही भाजपा कार्यकत्याने ही जागा सुचवलेली नाही. फोंडय़ातील डॉ. देव व डॉ. उसगाव यांची खासगी इस्पितळे सध्या बंद आहेत. ती ताब्यात घेण्याची सूचनाही आपण सरकारला केली आहे, अशी माहिती आमदार ढवळीकर यांनी केली.
फोंडा तालुक्याबरोबरच शेजारील धारबांदोडा, साखळी भागातील लोक उपचारासाठी फोंडा उपजिल्हा इस्पितळात येतात. फोंडा तालुक्याची लोकसंख्या साडेतीन लाख एवढी आहे. गरीबांसाठी हे इस्पितळ आधार आहे. फोंडा उपजिल्हा इस्पितळात ऑक्सिजन पुरवठय़ाची थेट सोय असल्याने याच कोविडसाठी त्याची निवड केल्याचे सरकार सांगते. तशी सुविधा कुडचडे, साखळी व मडगांव उपजिल्हा इस्पितळात नसल्यास गेल्या तीन महिन्यांत ही सुविधा का तयार केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने तीन महिन्यापूर्वी जादा वेटिंलेटर मागविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. सरकारने ऑक्सिजन वाहिन्यात टाकलेल्या नाहीत, मग हे वेटिंलेटर कसे चालणार असे ढवळीकर म्हणाले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सरकारने आता तरी योग्य पावले उचलण्याचा सल्ला त्यांनी दिला.