केंद्र सरकारचा निर्णय, अटल पेन्शनबाबतही लवकरच मान्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल पेन्शन स्कीम एनपीएसमध्ये गुंतवणूक करणाऱयांना कोरोना उपचारासाठी आंशिक रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचा लाभ 1.35 कोटी खातेधारकांना होणार आहे. पेन्शन व फंड नियामक व विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) हा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोविड 19 च्या उपचारासाठी खातेधारक काहीअंशी रक्कम काढू शकतो. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपातून जनतेला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी पीएफमधूनही सरकारने उपचारासाठी पैसे काढण्यास परवानगी दिली आहे.
कोविड 19 आजाराला भारत सरकारने महामारी घोषित केली आहे. हा प्राणघातक आजार असून त्याच्यावर इलाजासाठी खातेधारक आवश्यक रक्कम काढू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. तर असाच निर्णय अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱयांकरताही लवकरच घेतला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये सुमारे 3.46 कोटी खातेधारकांनी गुंतवणूक केली आहे.