ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना काळात अनेक सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे.
सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात सोनू सुदने देवदूत बनत अनेक स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून येत गरजवंतांची वेळोवेळी मदत केली होती. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला तर इंदूरमधील रुग्णांना 10 ऑक्सीजन सिलेंडर आणि इंजेक्शनची देखील मदत केली आहे.