प्रतिनिधी /सोलापूर :
कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहा जणांचा डय़ुटीवर असताना बळी गेला असून, यातील एकालाही नियमांप्रमाणे लाभ मिळाला नाही. त्यामुळे बळी गेलेल्या कामगारांचे नातेवाईक अद्यापपर्यंत वंचित आहेत. शासनाने संबंधितांना तात्काळ लाभ देण्याची मागणी महापालिकेच्या कामगार संघटनेने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात विविध हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवा बजावत असताना झाडूवाली विश्रांती लिंबाजी उडाणशिवे, क्लार्क शिलवंत रामचंद्र गायकवाड, आया सेविका शोभा धर्मा गायकवाड, नगरसचिव कार्यालयातील क्लार्क राजेंद्र बाबू साळुंखे, बिगारी नागनाथ शिवशरण आणि इतर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. यातील कामगार सेवा बजावत असताना कोरोना पॉझिटिव्ह आले असता याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता तेथे 4 लाख रूपये भरण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे यातील अनेक कामगारांचे पैशाअभावी मृत्यू झाले आहेत. सध्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन मृतांच्या नातेवाईकांना नियमाप्रमाणे 50 लाख रूपये द्यावे. तसेच मनपा कामगारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल निर्माण करून कामगारांसह त्यांच्या नातेवाईकांवर मोफत उपचार करावे, खाजगी हॉस्पिटलकडे दाखल असलेल्या कोरोनाबाधित कामगार व त्यांच्या नातेवाईकांवर उपचारासाठी ऍडव्हान्स रक्कम त्वरित द्यावी, अशा मागण्या कामगार संघटनेने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केल्या आहेत.
गरजामुळे सध्या पाच लाख रूपये द्या
-कामगारांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे इतरत्र रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने उपजिवीकेसाठी 50 लाखांतील सध्या आवश्यकता म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रूपये द्यावे. उर्वरित 45 लाख व कुटुंबातील एका वारसदारास मनपात तात्काळ नोकरी द्यावी.
-अशोक जानराव, अध्यक्ष, सोमपा कामगार संघटना कृती समिती
शासनाने तत्काळ आश्वासन पूर्ण करावे
-कोरोना काळात सेवा बजावताना मृत पावलेल्यांना शासनाच्या नियमांनुसार मुंबई व पुणे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनच्या निधीतून 50 लाख रूपये दिले आहेत. तसेच नातलगास नोकरी दिली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेने तात्काळ निर्णय घ्यावा. शासनाने नियमाप्रमाणे आम्हाला 50 लाख रूपये व तात्काळ नोकरी देऊन आमचा प्रश्न सोडवावा.