सणासुदीचे औचित्य साधत नियोजन : एलजी, सोनी, शाओमी, वीवो, रियलमी आदींचा समावेश
वृत्तसंस्था/ कोलकोता
मागील काही दिवसांपासून कोविडच्या संसर्गामुळे विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट केली आहे. सर्व उद्योगधंदे ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेचे चक्र मंदगतीने सुरु असल्याने सदर उत्पादनांची विक्री न होण्याच्या भीतीने उत्पादनात घट करण्यात आल्याचे पहावयास मिळाले आहे.
आता मात्र सरकारकडून अनलॉकची सुरुवात झाल्याने नक्याने कंपन्यांनी उत्पादन वाढीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये आता स्मार्टफोन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱया कंपन्यांनी येणाऱया सणासुदीच्या दिवसांचे औचित्य साधून आपले उत्पादन वाढवण्यासाठी जोरदारपणे नियोजनात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एलजी, सोनी, शाओमी, वीवो, रियलमी आणि पॅनासॉनिक आदी कंपन्यांचा समावेश आहे.
वरील कंपन्यांनी सणाचे औचित्य साधत जवळपास एक महिन्याआधीच उत्पादनास प्रारंभ करण्याची योजना आखली आहे. वीवो कंपनी पुढील महिन्यात आपले उत्पादन सुरु करणार असून सॅमसंग आणि शाओमीही अशीच योजना आखणार आहे.
विक्रीत तेजीचे संकेत
देशात मागील 25 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु यामध्ये टप्प्याटप्याने कपात करुन काही प्रमाणात देशातील उद्योगधंदे सुरु करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने पुढील उत्पादनांची विक्री जूनमध्ये तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.