प्रतिनिधी/ पणजी
कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यात येणार असून रोज किमान 2000 ते 2500 स्वॅब चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच रेमडेस्वीर औषध आणि प्लाझ्मा थेरपीचा बराच फायदा गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना होत असल्याचे दिसून आल्याने ही उपचार पद्धती चालूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
काल शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. ज्योस डिसा, आरोग्य सचिव अमित सतिजा आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाची भीती कमी झालेली नाही
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण बरेच उतरले असल्याचे दिसून आले असले तरी अद्याप तो आकडा समाधानकारक नाही. तसेच त्यावरून कोरोनाची भीती कमी झाली असे म्हणणेही धाडसाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसात चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळेही कदाचित रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसले असावे, असे राणे म्हणाले.
‘प्लाझ्मा‘ दिलेले रुग्ण लवकर बरे होतात
कोरोना चाचण्या वाढविण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार यापुढे रोज किमान 2500 चाचण्या करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. गंभीर अवस्थेतील रुग्णांचे प्राण वाचविण्यात रेमडेस्वीर औषध आणि प्लाझ्मा थेरपीचा खूप मोठा फायदा झाला. प्लाझ्मा थेरपी देण्यात आलेले रुग्ण लवकर बरे झाल्याचे आढळून आले आहे. प्लाझ्मा थेरपी दिलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के असून आतापर्यंत 263 रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
होम आयझोलेशनचा पर्याय निवडणाऱया बाधिताच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची चाचणी त्वरित करावी की 48 तासानंतर करावी, यासंबंधीही चर्चा झाली. घरातील अन्य व्यक्तींच्या, खास करून वयोवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत. एखाद्या गावात बाधित सापडल्यास त्याच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचीच तपासणी करणे महत्वाचे आहे. संपूर्ण गावातील लोकांची तपासणी करणे संयुक्तिक ठरणार नाही, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
कंपन्यांनी सरकारवर अवलंबून राहू नये
मोठय़ा कंपन्यांनी कर्मचाऱयांच्या तपासणीसाठी सरकारवर अवलंबून राहू नये. त्यांनी खासगी इस्पितळांकडे समन्वय करार करावा, असे सांगून आरोग्य खाते आणि गोमेकॉ एकमेकांशी समन्वय साधून कोरोनावर मात करण्यासाठी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गोवा सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न असतील. त्यासाठी सखोल तपासणी, होम आयझोलेशन बाबत गंभीरतेने विचार होईल. त्याचबरोबर कोरोनापूर्व गुंतागुंती डिजिटाईज करण्यात येणार असून त्यादृष्टीने डॉ. दुर्गा लवंदे यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ मंडळी कार्यरत राहील, असे ते म्हणाले.