हॉटेल, मंदिरे, जीम, सलून चालकांच्या चाचण्या झाल्या का ? खासगी क्लास चालकांचा सवाल
प्रतिनिधी / मिरज
उद्या सोमवारी 23 नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार असून, शासनाने सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी आदेश काढला आहे. मात्र, कोरोना चाचणी करुन घेण्यास शिक्षक आणि खासगी क्लास चालकांनी विरोध दर्शविला असून, केवळ शिक्षकांच्या चाचण्या केल्याने कोरोनाचा धोका टळणार आहे का ? असा सवाल खासगी क्लास चालकांनी उपस्थित केला आहे. एसटी, हॉटेल, मंदिरे, जीम, सलून सुरू झाल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा आदेश होता का ? मग शिक्षकांनीच कोरोना चाचणी कशासाठी करावी ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिक्षक जर कोरोना पॉझिटिव्ह नसतील आणि एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याची लागण शिक्षकांना होणार नाही का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे केवळ शिक्षकांची कोरोना चाचणी पुरेशी नाही. संबंधित विद्यार्थ्यांचीही कोरोना विषयक आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असल्याचे मत खासगी क्लास चालकांनी व्यक्त केले आहे.