ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना या जीवघेण्या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 425 जणांचा बळी घेतला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहचला आहे. चीनच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सोमवारी चीनमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला. तर 3,325 नवे रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या 5,072 संशयित रुग्ण आहेत. त्यामधील 2,788 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
चीनमध्ये एकूण 23,214 लोकांचा करोनाचा संसर्ग झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 1 लाख 71 हजार 329 जणांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरे बंद केल्याने अंदाजे 1.2 कोटी लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. तर भारतात केरळमध्ये कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. केरळमध्ये 2000 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.