हिंडलगा कारागृहात मास्क तयार करण्याचे काम, सरकारी यंत्रणेला होत आहे पुरवठा
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जगाला घातक ठरलेल्या कोरोनामुळे मानवी समाजाला प्रचंड हादरे बसले आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण देशभरात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा लक्षात घेऊन हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी मास्क बनविण्याचे काम हाती घेतले आहे. ना नफा ना तोटा पद्धतीने हे काम सुरू आहे.
कोरोनाचा फैलाव जसा वाढु लागला आहे तसा मास्क, सॅनिटायझर आदींच्या किंमती वाढल्या आहेत. भरमसाठ पैसे मोजण्याची तयारी असूनही दर्जेदार साहित्य उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे तर वैद्यकीय विभागात काम करणारा कर्मचाऱयांनाही मास्कचा तुटवडा भासू लागला आहे.
हा तुटवडा लक्षात घेऊन हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात उत्तम दर्जाचे मास्क बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारागृहात आधीपासूनच टेलरिंग विभाग कार्यरत आहे. अधिकारी व विद्यार्थ्यांचे गणवेश या विभागात तयार केले जातात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणवेशांची शिलाई बंद करून केवळ मास्क बनविण्यात येत आहेत.
टेलरिंग विभागात सुमारे 45 हून अधिक शिलाई मशिन आहेत. 60 कैदी दिवसभर मास्क तयार करण्यात गुंतले आहेत. महिला विभागातही हे काम सुरू आहे. बाजारातून मास्क तयार करण्यासाठी आवश्यक कपडा व इलॅस्टीक खरेदी करून आणण्यात आले आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर रोज 2 हजारांहून अधिक मास्क बनवून सरकारी विभागांना त्या पुरविण्यात येत आहेत.
सरकारी इस्पितळे, पोलीस खाते, जिल्हा प्रशासनाकडून मास्कची मागणी वाढली आहे. याबरोबरच रेडक्रॉसनेही 50 हजार मास्कची मागणी केली आहे. मागणी तसा पुरवठा करणे शक्मय होईनासे झाले आहे. कारण अचानक मागणी वाढल्यामुळे उत्पादन व पुरवठा यांचा ताळमेळ जमेना झाला आहे. आतापर्यंत सरकारच्या विविध खात्यांना 10 हजार मास्क वाटप करण्यात आल्याची माहिती कारागृहाचे मुख्य अधिक्षक कृष्णकुमार यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कारागृहातही खबरदारी घेण्यात आली. वेगवेगळय़ा प्रकरणात अटक होऊन कारागृहात येणाऱया नव्या कैद्यांना स्वतंत्र विभागात ठेवण्यात येत आहे. पूर्णपणे तपासणी केल्यानंतरही तब्बल महिनाभर नव्या कैद्यांना क्वॉरंटाईन विभागात ठेवण्यात येत आहे. महिन्याभरातही त्यांच्यात लक्षणे दिसले नाहीत तर अशा कैद्यांना कच्च्या कैद्यांच्या विभागात ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती कारागृहातील डॉ. व्ही. एम. यमकनमर्डी यांनी दिली..