सक्रिय रुग्णांचा आकडा 10228 : चोवीस तासात 1410 नवे बाधित वर्षभरातील मृतांचा आकडा 964
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील कोरोना मृत्यूचे दृष्टचक्र चालूच असून गेल्या 24 तासात म्हणजे गुरुवारी 21 जणांचे बळी गेले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांनी 10,000 चा पल्ला पार केला असून त्यांची संख्या 10228 वर पोहोचली आहे. दिवसभरात 1410 नवीन कोरोनाबाधित सापडले तर 461 जण बरे होऊन घरी गेले. एकूण मृतांचा आकडा 964 झाला असून मडगाव आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली असून ती 1134 वर गेली आहे. संशयित रुग्ण म्हणून 135 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 651 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बळींची संख्या वेगाने वाढत असून तो कल असाच चालू राहिला तर येत्या दोन तीन दिवसात कोरोना बळींचा आकडा 1000 चा टप्पा पार करणार अशी चिन्हे दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्याही प्रतिदिन सरासरी दीड हजाराने वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा 10,000 पेक्षा जास्त पुढे गेल्याचे समोर आले आहे.
मडगाव, कांदोळी, पर्वरीत झपाटय़ाने फैलाव
कांदोळी व पर्वरी आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांनी 800 चा टप्पा ओलांडला असून तेथे अनुक्रमे 885 व 887 रुग्णांची नोंद झाली आहे. फोंडा आणि पणजी या दोन आरोग्य केंद्रानी 600 रुग्णांचा टप्पा पार केला असून तेथे अनुक्रमे 600 व 683 रुग्ण सापडले आहेत. म्हापसा, कुठ्ठाळी, वास्को या आरोग्य केंद्रानी 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळाले असून तेथे अनुक्रमे 546, 560 व 633 असे रुग्ण आहेत. मडकई, सांगे या दोन आरोग्य केंद्राचे रुग्ण शंभरीवर टेकले असून तेथे अनुक्रमे 97 व 96 रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनामुळे आठ दिवसांत तब्बल 94 जणांचा मृत्यू
एकंदरीत सर्व आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून राज्यातील शहरी, ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात फैलावर होत असल्याचे दिसून येत आहे. 15 ते 22 एप्रिल या केवळ आठ दिवसांत 7380 कोरोनाबाधित झाले असून तब्बल 94 जणांचे बळी गेले आहेत. विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 229, सांखळी 279, पेडणे 226, वाळपई 131, म्हापसा 546, पणजी 683, हळदोणा 205, बेतकी 81, कांदोळी 885, कासारवर्णे 70, कोलवाळ 184, खोर्ली 173, चिंबल 346, शिवोली 244, पर्वरी 887, मये 63, कुडचडे 187, काणकोण 158, मडगाव 1134, वास्को 633, बाळ्ळी 130, कासावली 314, चिंचणी 163, कुठ्ठाळी 560, कुडतरी 162, लोटली 176, मडकई 97, केपे 109, सांगे 96, शिरोडा 158, धारबांदोडला 142, फोंडा 600 व नावेली 170.
अठरा वर्षावरील सर्वांना 1 मेपासून मोफत कोरोना लस : मुख्यमंत्री
राज्य सरकार रु. 60 कोटी खर्च करून 15 लाखापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लस विकत घेणार असून ती लस 18 ते 45 वयोगटातील लोकांना मोफत देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्रथम टप्प्यात 5 लाख लस थेट औषध कंपनीकडून घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण चालू करण्यात येणार असून त्यास सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आणि जाहीर केलेल्या दरानुसार सिरम इन्स्टिटय़ूटकडून ती लस विकत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकांनी पुढे येऊन लस घ्यावी. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लस हा एक उत्तम उपाय आहे. गोव्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्याचे प्रमाण अजूनही वाढवण्याची आवश्यकता आहे. अधिकाधिक लोकांना लस देऊन गोवा सुरक्षित ठेवायचा आहे, सर्वांनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.