पणजी /प्रतिनिधी
कोविडबाधितांची संख्या तब्बल चार हजारांच्या घरात पोहोचली असून गेल्या 24 तासात नव्याने 540 जणांची भर पडली आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीचे प्राण गेले असून त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 846 झाली आहे. राज्यातील परिस्थिती भयानक होत चालली असून पणजीमध्ये आतापर्यंत 295, मडगावमध्ये 386, कुठ्ठाळीमध्ये 231, कुडतरीमध्ये 52, फोंडामध्ये 304, पर्वरीमध्ये तब्बल 415 प्रकरणांची नोंद झालेली आहे.
राज्यात कोविडग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यात देखील नव्याने लॉकडाऊन करावा लागणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात नव्याने 540 रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात 3969 हे कोविडचे सक्रियबाधित असून राज्य सरकारने अद्याप पर्यटनावर वा पर्यटकांवर कोणत्याही नव्या अटी लादलेल्या नाहीत. पणजी, पर्वरी, मडगाव ही तीन केंदे राज्यात रेड झोनमध्ये आली आहेत. याठिकाणी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या आठ दिवसांत कोबडबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली आहे.