चीनमधील वैज्ञानिकांचा दावा : क्लीनिकल ट्रायलची तयारी सुरू : पेटंटसाठी केला अर्ज
वृत्तसंस्था/ बीजिंग
कोरोना विषाणू नष्ट करण्यास सक्षम ह्यूमन न्यूट्रोलायजिंग अँटीबॉडीचा शोध लावल्याचा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. या अँटीबॉडीमुळे कोरोनावरील औषध तसेच त्यासंबंधी सुरू असलेल्या संशोधनाला मदत मिळणार असल्याचे मानले जात आहे. चिनी वैज्ञानिकांनी याच्या क्लीनिकल ट्रायलची तयारी देखील सुरू केली आहे.
चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाने ह्युमन न्यूट्रोलायजिंग अँटीबॉडीचा शोध लावला आहे. कोरोना विषाणूवर याच्या मदतीने प्रभावी उपचार करता येऊ शकतो. या अँटीबॉडीच्या पेटंटसाठी वैज्ञानिकांनी अर्ज दाखल केला आहे.
भविष्यात या अँटीबॉडीवरून अनेक प्रकारच्या क्लीनिकल ट्रायल्स केल्या जाणार आहेत. यात यश आल्यास याचे औद्योगिक उत्पादनही सुरू केले जाणार असल्याचे मायक्रोबायोलॉजी इन्स्टीटय़ूटने म्हटले आहे. याच्याशी संबंधित संशोधनपत्र यान जिंगहुआ, गाओ फू आणि वांग क्यूहुई यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोबायोलॉजी इन्स्टीटय़ूटच्या पथकांनी तयार केला आहे. इन्स्टीटय़ूटने जानेवारीपासून कोरोनासंबंधी संशोधन सुरू केले होते. यादरम्यान कोरोना बाधितांकडून प्राप्त करण्यात आलेल्या सीरमद्वारे कित्येक ह्युमन न्यूट्रोलायजिंग अँटीबॉडीचा शोध लावण्यात आल्याचे संशोधनपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संसर्ग रोखण्यास यशस्वी
यातील दोन अँटीबॉडी कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यास यशस्वी ठरल्याचे चाचणीदरम्यान वैज्ञानिकांना आढळून आले आहे. वानरांवर करण्यात आलेल्या चाचणीत या अँटीबॉडीने त्यांच्या श्वसनतंत्राला पूर्णपणे कोरोनामुक्त केले आहे. अँटीबॉडीच्या विकासासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचे काम पूर्ण झाले असून याचे उत्पादन पुढे नेत क्लीनिकल ट्रायलची तयारी केली जात असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.