अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 22 सप्टेंबर, 2021, सकाळी 9.45
● जिल्ह्यात साथीच्या आजाराने रूग्णालये फुल्ल
● आजारात बालकांचे प्रमाण जास्त
● गेल्या 24 तासात कोरोनाचे 258 रूग्ण वाढले
● 9 हजार 132 संशयितांच्या चाचण्या
● फलटण 78, सातारा 52, खटाव 43
● पॉझिटिव्हीटी रेट 2.83 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरपणा प्रचंड वाढला आहे. बेफिकिरपणातच जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सातत्याने वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे ताप, थंडी,सर्दीच्या रूग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यामधे बालकांचे प्रमाण जास्त असून अपवाद वगळता बालरूग्णालये फुल्ल झालेली पहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या नियमांचेही पालन आवश्यक आहे. अन्यथा साथीच्या आजारात बाळगलेल्या बेफिकिरपणामुळे कोरोना पुन्हा डोके वर काढू नये, याची काळजी घ्यावी लागेल. दरम्यान गेल्या 24 तासात 9 हजार 132 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 258 कोरोना रूग्ण वाढले आहेत. या दोन्ही आकड्यांवरून जिल्ह्यातील सध्याचा पॉझिटिव्हीटी रेट 2.83 झाला आहे.
साथरोगात बालकांचे प्रमाण लक्षणीय
जिल्ह्यातील सातारा, कोरेगांव, कराड, महाबळेश्वर, जावली, पाटणसह अनेक तालुक्यात वातावरणातील बदल अचानक होत आहे. कधी मुसळधार पाऊस तर कधी उन्हाळ्यासारखे कडक ऊन हैराण करत आहे. या बदलाने ताप,सर्दी,मळमळ, खोकला, अंगदुखीचे रूग्ण वाढले आहेत. खासगी दवाखान्यांचा अंदाज घेतला असता अशा रूग्णांची सध्या भर पडत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राकडून सांगितले जाते. चिंताजनक म्हणजे यामधे लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पालक अस्वस्थ…शिक्षक चिंतेत
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात आल्याने वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील 2444 शाळा सुरू करण्यावर शासन पातळीवर विचार सुरू आहे. मात्र सध्याची ताप, सर्दी, खोकल्याची साथ बहुतांशी गावात, घरात असल्याने पालक अस्वस्थ आहेत. शिवाय शाळा सुरू करताना काटेकोर काळजी घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करावा हे बंधन असले तरी शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांकडून ते कितपत पाळले जाते याची चिंता शिक्षकांना आहे. एकीकडे शाळा सुरू होण्याचा आनंद असला तरी दुसरीकडे नियमांच्या पालनावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 258
मुक्त 445
मृत्यू 00
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 20,07,883
एकूण बाधित 2,46,998
एकूण कोरोनामुक्त 2,37,004
मृत्यू 6,049
उपचारार्थ रुग्ण 6,879