नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशात औषधे आणि ऑक्सिजन पुरवठय़ाबाबत एक टास्क फोर्स (कृती दल) स्थापन केला आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून औषधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक फॉर्म्युला बनविण्यात येणार आहे. कोरोनाविरोधी लढय़ात निर्माण झालेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी हे कृतीदल दक्ष राहणार असून सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने टास्क फोर्स नियुक्त करण्याचा आदेश शनिवारी दिला. या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य असून त्यामध्ये देशातील दहा नामांकित डॉक्टर आणि दोन शासकीय स्तरावरील अधिकाऱयांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ञ हे राज्याच्या विविध भागातील असून ते आरोग्य विभागातील तज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
टास्क फोर्सचे सदस्य…
1. डॉ. भाबतोष बिस्वास, कोलकाता-पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु
2. डॉ. देवेंद्रसिंग राणा, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटल व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष
3. डॉ. देवीप्रसाद शेट्टी, बेंगळूरमधील ‘नारायणा हेल्थकेअर’चे अध्यक्ष-कार्यकारी संचालक
4. डॉ. गगनदीप कांग, वेल्लोर-तामिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर
5. डॉ. जे. व्ही. पीटर, वेल्लोर-तामिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे संचालक
6. डॉ. नरेश त्रेहान, गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक
7. डॉ. राहुल पंडित, मुलुंड-मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक
8. डॉ. सौमित्र रावत, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ञ
9. डॉ. शिवकुमार सरीन, दिल्लीतील ‘लिव्हर अँड बाइलियरी सायन्स’मधील तज्ञ
10. डॉ. जरीर एफ. उदवाडिया, मुंबईतील हिंदुजा, ब्रीच कँडी आणि पारसी जनरल हॉस्पिटलमधील तज्ञ
11. कार्यकारी सदस्य ः आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव
12. केंद्राचे कॅबिनेट सचिव ः नॅशनल टास्क फोर्सचे कन्व्हेनर किंवा सदस्य
संशयित कोरोनाबाधितांवरही उपचार करणे बंधनकारक
ऍडमिट होण्यासाठी कोरोना अहवालाची गरज नाही ः नियम-धोरणात केंद्राकडून बदल
कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवण्याची गरज भासणार नाही. सरकारने कोरोना उपचार नियमावलीमध्ये बदल केला असून संशयित व्यक्तीलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करून घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत.
रुग्ण स्थानिक नसला तरी उपचार करावे लागतील!
नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्र नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असे नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
उपचारासाठीचे नियम…
@रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या अहवालाची गरज नाही
@कोरोना संशयित व्यक्तीही प्रकृती अत्यवस्थ असल्यास रुग्णालयात अ?Ÿडमिट होऊ शकते.
@रुग्णाला ओळखपत्र नाही म्हणून रुग्णालयात अ?Ÿडमिट करण्यापासून रोखता येणार नाही
@उपचार घेणाऱया रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही.
@रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केले जाईल.
@रुग्णालयात अ?Ÿडमिट करण्याची गरज नसताना विनाकारण बेड अडवून ठेवण्याचे प्रकार टाळावेत.