वार्ताहर /रामदुर्ग :
कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासन व प्रशासन निरंतर लढा देत आहे. नागरिकांनीही सुचनांचे पालन करीत सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी व्यक्त केले.
रामदुर्ग येथील मिनीविधानसौधमधील तहसीलदार कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साहाय्यनिधीस दानशूर नागरिकांकडून धनादेश देण्यात आला. राजगोपाल राठी यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री निधीसाठी 11 लाख, संगमेश शेट्टी सदावर्ते, एम. एम. अत्तार, मैलाद बशीडोणी यांनी प्रत्येकी 1 लाख, जगदीश ट्रेडर्स 75 हजार, सिमा टेक्सटाईल 11 हजार, गोपाळ टेक्सटाईल 10 हजार, गोपाळ मुंड्रा 2100, श्री ट्रेडर्स 25 हजार, सिद्धाप्पा संगळ 10 हजार, पुरुषोत्तम मेटल्स 5100 रुपये अशी देणगी दिली.
एकूण प्रधानमंत्री साहाय्यता निधीस 11 लाख 98 हजार 100 रुपये तर मुख्यमंत्री परिहार निधीस 3 लाख 51 हजार 100 रुपयाचा धनादेश यावेळी बैलहोंगलचे प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री यांच्यामार्फत देण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश स्वादी, सीपीआय लखन मसगुप्पी, मल्लन्ना यादवाड यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.