उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांचे पणजीतील व्यापाऱयांना आदेश
प्रतिनिधी / पणजी
कोरोना नियमावलीचे कठोरतेने पालन होत असल्याची खात्री करा, सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व व्यापाऱयांना मास्क आणि सेनिटायझरचा वापर करण्याची सक्ती करा, तसेच ग्राहकांनाही मास्क वापरण्यासाठी उद्युक्त करा, सामाजिक अंतर पाळा, असे आदेश तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी पणजी मार्केट संघटनेस दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी आयोजित विशेष बैठकीत श्री. देसाई यांनी पणजी मार्केट संघटनेच्या पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असले तरी मार्केटातील व्यवहार मात्र कोणतेही निर्बंध न पाळता चालत आहेत, सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे, सेनिटायझर-मास्कचा वापर टाळला जात आहे, यासारख्या अनेक तक्रारी उपजिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळेच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस उपजिल्हाधिकाऱयांसमवेत जिल्हा न्याय दंडाधिकारी, मामलेदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मनपातील अधिकारी यांची उपस्थिती होती.