प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. पण शहराचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया कॅन्टोन्मेंट परिसरात मात्र सर्वकाही आलबेल आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरात कोरोनाचा फैलाव होत नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
बाजापेठेत गर्दी होत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना करण्यात येत आहे. विनामास्क कारवाई करण्याबरोबर सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र कॅन्टोन्मेंटकडून कोणतीच उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. केवळ कॅन्टोन्मेंट कार्यालयात नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता शहराप्रमाणे कॅन्टोन्मेंट परिसरातीलदेखील कोरोना नियमावलीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. पण जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातदेखील विविध व्यवसाय, हॉटेल आणि रहदारी असते. त्यामुळे या भागातील रहिवाशांसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पण कॅन्टोन्मेंट परिसरात कोरोना प्रसार होत नसल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरू आहे. गुरुवारी दुपारी बेळगाव बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. पण कॅन्टोन्मेंट परिसरात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे एकाच शहरात दोन कायदे राबविण्यात येतात का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेतील काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पाठोपाठ आता कॅन्टोन्मेंट कार्यालयातील एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी आढळून आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट कार्यालयात मुख्य पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱयाच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अधिकाऱयासह कुटुंबातील संपूर्ण सदस्य कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल गुरुवारी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयातील कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत. सदर अधिकाऱयाच्या संपर्कात कार्यालयातील सर्व कर्मचारी होते. पण अधिकारीच कोरोनाबंधित असल्याची माहिती मिळाल्याने कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्याची विनंती कॅन्टोन्मेंट कार्यालयातील कर्मचाऱयांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.