15 महिन्यांनी निर्बंध हटविले -नाइटक्लबमध्ये लोकांची गर्दी
वृत्तसंस्था / लंडन
कोरोना संक्रमणाच्या तिसऱया लाटेदरम्यान ब्रिटनमध्ये ‘फ्रीडम डे’पूर्वी लॉकडाउन निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच कुठल्याही निर्बंधांशिवाय नाइट क्लबमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती देण्यात आली आहे. रविवारी रात्री नाइट क्लब आणि बारबाहेर मोठमोठय़ा रांगा दिसून आल्या आहेत.
अनेक लोकांना बार आणि क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी एक तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये निर्बंध लागू करण्यात आल्यावर लोकांनी पहिल्यांदाच कुठल्याही निर्बंधांशिवाय पार्टीचा आनंद घेतला आहे. ब्रिटनमध्ये 19 जुलैच्या मध्यरात्रीपासून बहुतांश निर्बंध हटविण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये चार टप्प्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चौथा टप्पा 19 जुलैपासून लागू करण्यात आला आहे.
मास्क अनिवार्य नाही
ब्रिटनमध्ये फ्रीडम डेचा जल्लोष साजरा करण्यासाठी नाइट क्लबांनी स्वतःचे दरवाजे खुले केले आहेत. ब्रिटनमध्ये आता कायदेशीर स्वरुपात मास्क परिधान करणेही अनिवार्य नाही. नाइट क्लबमध्ये जाणाऱया लोकांच्या संख्येवरही आता कुठलेच बंधन नाही. तसेच वर्क फ्रॉम होम देखील आता अनिवार्य नसणार आहे. पण स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे.
लसीकरणाचे लक्ष्य गाठले
ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाचे निर्धारित करण्यात आलेले लक्ष्य निश्चित कालावधीपूर्वीच प्राप्त करण्यात आल्याची घोषणा सरकारने रविवारी केली आहे. आरोग्य आणि सामाजिक देखभाल विभागानुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत 8 कोटी 19 लाख 59 हजार 398 डोस देण्यात आले आहेत. देशातील 67.8 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
तिसऱया लाटेचे संकट
याचदरम्यान ब्रिटनच्या या निर्णयावर जगभरातून टीका देखील होत आहे. ब्रिटन सध्या कोरोना महामारीच्या तिसऱया लाटेला सामोरा जात आहे. देशात शुक्रवारी 51,870 नवे कोरोनाबाधित सापडले होते. जानेवारीनंतर पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये 50 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. सुमारे 68 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले असताना ही स्थिती उद्भवली आहे. आरोग्यमंत्री साजिद जावेद हे देखील शनिवारी कोरोना संक्रमित आढळले आहेत. आरोग्यमंत्री जावेद कोरोनाबाधित आढळल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसोलेशनमध्ये आहेत.
तज्ञांचा इशारा
लॉकडाउनशी संबंधित निर्बंध पूर्णपणे हटविणे ‘धोकादायक आणि अनैतिक’ ठरेल असा इशारा 1200 हून अधिक तज्ञांनी सरकारला दिला आहे. सर्वप्रकारचे निर्बंध हटविण्याची तयारी सुरू असतानाच देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या दर दोन आठवडय़ांमध्ये दुप्पट होत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेमागील मुख्य कारण विषाणूचा डेल्टा व्हेरियंट आहे.