जिल्हाधिकाऱयांचे आदेश : आरोग्य यंत्रणेचा आढावा : कोरोना चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर समन्वय अधिकारी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुरेसा पौष्टिक आहार देण्यात यावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. तसेच कोरोना चाचण्यांबाबत समन्वय राखण्यासाठी तातडीने समन्वय अधिकारी नेमावा. जिल्हय़ातील व्याधीग्रस्तांचा आरोग्य यंत्रणेमार्फत सर्व्हे करावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेचाही आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शाखा अभियंता व्ही. व्ही. जोशी तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, कोरोना साथरोगामुळे रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्रास होऊ नये तसेच त्यांच्यावरील उपचाराच्या सुविधा परिपूर्ण असाव्यात, यासाठी इमारती भक्कम असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील ज्या ठिकाणी गळती होत आहे, अशा सर्व ठिकाणांची बांधकाम विभागाने पाहणी करून ती गळती थांबविण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना तातडीने करावी.
आरोग्य यंत्रणेचाही घेतला आढावा
जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचण्या होत असतात. यामध्ये समन्वय राखण्यासाठी तातडीने समन्वय अधिकारी नेमावा. जिल्हय़ात रोज सुमारे 250 कोरोना चाचण्या होत आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 150 व ऍन्टीजन टेस्टद्वारे सुमारे 100 चाचण्या करण्यात येतात. कोरोना बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरेसा पौष्टिक आहार देण्यावरही भर द्यावा. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया (कॉन्टॅक्ट टेसिंग) गतीने राबवावी.
आरोग्य यंत्रणेमार्फत व्याधीग्रस्तांचा सर्व्हे
राज्य शासनाने लॉकडाऊनचे बहुतांश निर्बंध उठवल्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हे करावा. यामध्ये ह्रदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, कॅन्सर व इतर गंभीर आजार असणाऱया नागरिकांची आरोग्य यंत्रणेने यादी तयार केली आहे. या संबंधित व्यक्तींच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (SPO2 Level) आणि इतर रोग लक्षणांची आरोग्य यंत्रणेमार्फंत तपासण्या करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.