शनिवारी 60 नवे रुग्ण राज्यात धोका वाढला काही पंचायतींचा लॉकडाऊनचा निर्णय
प्रतिनिधी / पणजी, मडगाव
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली असून शनिवारी तब्बल 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यामुळे आता रुग्णांची संख्या 454 वर पोहोचली आहे. गोव्याची वाटचाल धोक्याच्या दिशेने सुरू झाली आहे. दरदिवशी रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. त्याचे परिणाम म्हणून धास्ती घेतलेल्या लोकांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. आगरवाडा, मेरशी, नास्नोळा, हळदोणा आदी पंचायतींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढती चालली आहे, तर दुसऱया बाजूने मोठय़ा प्रमाणात लोकांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. मांगोरहिल भागात आणखी 26 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर अन्य भागात आणखी 29 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने या 29 जणांना बाधा झाली आहे. गोव्याबाहेरून आलेले आणखी 5 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य खात्यावरील ताण वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर रुग्ण सापडणाऱया भागातील लोकांच्या चाचण्याही वाढत आहेत.
गोमेकॉतील सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षारक्षकाचे काम करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे आता गोमेकॉतील सर्व सुरक्षारक्षकांचे स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठविले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्याही चाचण्या केल्या आहेत. त्यांना अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या भागात रुग्ण सापडले त्या भागातील लोकांच्या चाचण्या अशाच पद्धतीने सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. त्याचबरोबर या सेवेशी संबधित कर्मचारीवर्ग व त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.
चार पंचायतींचा लॉकडाऊनचा निर्णय
कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने व कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने आगरवाडा-चोपडे, नास्नोळा, मेरशी व हळदोणा या पंचायतींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तीन पंचायतींनी 8 दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे, तर हळदोणा पंचायतीत 3 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आगरवाडा पंचायतीने घेतला आहे, तर फार्मसी, बँक, कर ऑफिस, सोसायटी, सरकारी कार्यालये, क्लिनिक व डेअरी खुली असणार आहेत. लॉकडाऊन नियमाचा भंग करणाऱयाला 5000 रुपये दंड दिला जाणार आहे. नास्नोळा पंचायत आणि मेरशी पंचायतीने 15 ते 21 पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर हळदोणा पंचायतीने 14 ते 16 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
कोलवा रेसिडन्सीचा कोविड केअर सेंटरसाठी वापर
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आता पर्यटन विकास महामंडळाची कोलवा रेसिडन्सी कोविड केअर सेंटरसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी त्याबाबतचा निर्णय घेतला आहे. 12 जूनपासून या रेसिडन्सीचा वापर कोरोना केअर सेंटरसाठी करण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
चिंबल, मडगावमध्ये सामूहिक चाचण्या
चिंबल आणि परिसरात आता सर्व लोकांच्या सामूहिक चाचण्या करण्यावर आरोग्य खात्याने भर दिला आहे. तीन दिवसांत आठ रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मडगावातील मोती डोंगर व आझाद नगर भागातही सामूहिक चाचण्यांना सुरुवात केली आहे. इएसआय क्वार्टरमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आता सामूहिक चाचण्या सुरू केल्या आहेत.
पहिला कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर
कोरोना रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत एकाही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले नव्हते, मात्र शनिवारी पहिल्याच रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याची स्थिती थोडी चिंताजनक आहे. बेती येथून त्याला दोन व्यक्ती गोमेकॉत घेऊन आल्या होत्या, मात्र आता या दोन्ही व्यक्ती गायब झाल्या आहेत. सदर रुग्णाला हार्टऍटॅक आला होता, असे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला कोविड इस्पितळात दाखल केले आहे व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्या दोघांचा शोध जारी हृदयविकाराचा झटका आल्याने सदर रुग्णाला गोमेकॉत आणणाऱया दोन व्यक्तांचा सध्या शोध सुरू आहे. या व्यक्तीनीं आपले मोबाईल बंद ठेवल्याने, त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सचिव नीला मोहनन यांनी दिली आहे. गोमेकॉत दाखल केलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने, त्या दोघांचा शोध लागणे खुपच महत्त्वाचे बनले आहे. ते कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले आहेत.