प्रतिनिधी/ पणजी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कोविडवरील ‘कोविक्सीन’ या लसीची चाचणी सोमवार 20 जुलै रोजी धारगळ येथील रेडकर इस्पितळात होणार आहे. आतापर्यंत पटणा, दिल्ली येथे सुमारे 50 लोकांवर या लसीची चाचणी झालेली आहे. भारतातील पहिली कोविडवरील लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने तयार केली आहे. या चाचणीकडे लोक मोठय़ा अपेक्षेने पाहत असून कोरोनाविरोधातील लढय़ात हा पहिला टप्पा मानला जात आहे.
गोव्यात क्रोम क्लिनिक रिसर्च आणि मेडिकल टय़ुरिझम ही संस्था मानवी चाचण्याची प्रक्रिया पाहणार आहे. गोव्यातील धारगळ येथील रेडकर इस्पितळात ही चाचणी करण्याचे निश्चित केले आहे. आयसीएमच्या पत्रानुसार 7 जुलै रोजी ही चाचणी केली जाणार होती, पण प्रोटोकॉल कमिटमेंटनुसार एम्स दिल्ली, एम्स पटणा, हैदराबाद व रोहतक येथे अगोदर चाचण्या करण्यात आल्या. आता सोमवारपासून धारगळ येथील रेडकर इस्पितळात चाचणी केली जाणार आहे.
कोरोनाचा संहारक असा फैलाव सुरू असून रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर उपचार नसल्याने लोकांमध्ये प्रचंड धास्ती आहे. आतापर्यंत 21 रुग्णांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लसीकडे देशभरातील जनतेने लक्ष लागून राहिले आहे. गोव्यातही या लसीच्या चाचणीबाबत उत्सुकता आहे.