सांगरुळ / प्रतिनिधी
सांगरुळ येथील युवकांनी ग्रामपंचायती च्या सहकार्याने दक्षता कमिटीच्या माध्यमातून कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी उस्फूर्तपणे व नियोजनबद्धरीत्या राबविलेला सांगरुळ पॅटर्न आदर्शवत असून तालुक्यातील इतर गावांनीही हा पॅटर्न आपल्या गावात राबवावा असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी केले. सांगरूळ तालुका करवीर येथे भेट देऊन त्यांनी येथील उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर त्या बोलत होत्या. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत समन्वयाने सुरू असलेल्या कामकाजाचे विशेष कौतुकही तहसीलदार शीतल भामरे यांनी केले.
यावेळी बोलताना तहसीलदार भामरे यांनी कोरोना विषाणूंच्या संसर्गाने सर्वत्र थैमान घातले असून या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने देशभर संचार बंदी आदेश लागू केला आहे. या आदेशाचे पालन करून कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपल्या गावाचा बचाव करण्यासाठी गावोगावी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सांगरूळ तालुका करवीर येथील ग्रामपंचायत गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते सेवाभावी संस्था व आजी-माजी लष्कर जवान व पत्रकार यांच्या सहकार्यातून एक दक्षता समिती तयार झाली असून या समितीने मास्टर प्लॅन करून नियोजन बद्दल यंत्रणा राबवली जात आहे. हे कौतुकास्पद आहे. दक्षता कमिटीच्या चांगल्या कामकाजामुळे कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणारा सांगरूळ पॅटर्न म्हणून सर्वत्र गवगवा झाला आहे. प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन असलेला हा पॅटर्न तालुक्यातील सर्व गावानी राबवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी सांगरूळ ग्रामपंचायत कार्यालयात दक्षता समिती मार्फत राबविल्या जात असलेल्या सांगरुळ पॅटर्नची माहिती जाणून घेतली. तसेच दक्षता समिती मार्फत गावात सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन संचारबंदी आदेशाचे पालन करत नागरिकांना अत्यावश्यक सेवांची सुविधा उपलब्ध करून देताना केले जाणाऱ्या नियोजनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले .यावेळी सरपंच सदाशिव खाडे,उपसरपंच सर्जेराव यादव , दिलीप खाडे यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य दक्षता समितीचे सदस्य ग्राम विकास अधिकारी पी एम बिडकर, सर्कल सुहास गोदे ,तलाठी शर्मिला काटकर उपस्थित होते .आभार नवीनचंद्र सनगर यांनी मानले.