ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाने प्रभावित झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. या प्रभावित राज्यांना भेटी देणाऱ्या उच्चस्तरीय समित्यांचा अहवालही या बैठकीत मांडण्यात येईल.
देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. राज्यांच्या लसीकरणाची प्रगती आणि त्यातील अडचणींचाही ते आढावा घेणार आहेत. या बैठकीला आयसीएमआर आणि एनसीडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.