श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील एका तुरुंगात दंगल भडकली आहे. या दंगलीत किमान 8 कैद्यांना जीव गमवावा लागला तर 55 जण जखमी झाले आहेत. काही कैद्यांनी तुरुंगाचा दरवाजा उघडून पलायनाचा प्रयत्न केल्याने अधिकाऱयांनी बळाचा वापर केला होता. याचमुळे तेथे दंगल भडकली आहे. तुरुंगात कोविड-19 फैलावल्याच्या अफवेनंतर ही दंगल सुरू झाली आहे.
श्रीलंकेच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबण्यात आलेल्या तुरुंगांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही घटना घडली आहे. या महामारीमुळे कैद्यांदरम्यान अस्वस्थता वाढत आहे. कैद्यांनी अलिकडेच निदर्शनेही केली आहेत.
पूर्ण घटनेत दोन तुरुंग अधिकाऱयांसह किमान 37 जण जखमी झाले आहेत. दंगलखोरांनी स्वयंपाकघर आणि तुरुंगाच्या नोंदणी कक्षाला आग लावून दिली होती.
कोरोना संकटामुळे अन्य तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी कैद्यांनी केली होती. महारा तुरुंगात 175 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तुरुंगाशी संबंधित 1 हजारांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. मागील आठवडय़ातही हिंसाचारात एका कैद्याला जीव गमवावा लागला होता.
श्रीलंकेच्या 10 हजार कैद्यांच्या क्षमतेच्या तुरुंगांमध्ये 26 हजारांहून अधिक जणांना डांबण्यात आले आहे. तर श्रीलंकेतही आतापर्यंत 22,988 रुग्ण सापडले असून 109 जणांचा मृत्यू ओढवला आहे.