प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना बळींची संख्या अद्यापही वीसपेक्षा जास्तच असून बुधवार दि. 2 जून रोजी 22 जणांचे बळी गेले आहेत. बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असून मंगळवारच्या 903 च्या तुलनेत बुधवारी 706 एवढे बाधित सापडले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 10840 वर पोहोचली आहे.
राज्यातील एकूण बळींची संख्या 2693 तर एकूण बाधितसंख्या 157275 वर पोहोचली आहे. गत 24 तासात बरे झालेल्या 1711 रुग्णांसह एकूण 143742 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 3715 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 706 बाधित सापडले. त्यापैकी 101 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 605 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण 91.40 टक्क्यांवर पोहोचले आहे.
बुधवारी बळी गेलेल्या 22 जणांपैकी 16 जण गोमेकॉत व दोघे दक्षिण जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयात दोघे तर दक्षिण गोवा खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. अन्य एका रुग्णाला हॉस्पिसियोत मृत आणण्यात आला होता. या मृतांमध्ये 42 पासून 83 वर्षे वयोगटातील 17 पुरुष आणि 5 महिला रुग्णांचा समावेश आहे. या बळींपैकी तिघांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मडगावात 813 रुग्ण
संपूर्ण मे महिन्यात कायम सर्वाधिक रुग्ण असलेल्या मडगाव केंद्रातील रुग्णसंख्याही जून महिन्याच्या प्रारंभापासून कमी होऊ लागली असून बुधवारी तेथे 813 रुग्ण होते. राज्यातील 33 पैकी केंद्रांमध्ये आता तीन अंकी संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील फोंडा केंद्रात 773, पणजीत 550 व कांदोळीत 448 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. सर्वात कमी 104 रुग्ण मये केंद्रात आहेत.