रविवारी आठ जणांना मृत्यू
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाने 500 बळींचा टप्पा ओलांडला असून बळींचा एकूण आकडा 507 झाला आहे. काल रविवारी आठ जणांचे बळी गेले. 432 नवे कोरोनाबाधित सापडले तर 426 जणांनी कोरोनावर मात केली. संशयित रूग्ण म्हणून 64 जणांना गोमेकॉतील विलगीकरण वॉर्डात भरती करण्यात आले असून 174 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या 38366 झाली असून त्यातील 33203 जण बरे झाले आहेत. सध्या 4656 एवढे सक्रिय रूग्ण असून ते विविध हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
जूनमध्ये गोव्यात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर बळींचे प्रमाण हळूहळू वाढत गेले. गेल्या चार-साडेचार महिन्यात 500 बळींचा आकडा पार झाला आहे. म्हणजेच महिन्यात सरासरी 100 बळी गेल्याचे समोर येत आहे. सध्या दर दिवशी कोरोनाचे बळी जात असून मागील तीन महिन्यात तर बळी गेला नाही असा एकही दिवस गेला नाही. दररोज एकेरी संख्येने बळी जात असून कधीतरी मध्येच दुहेरी संख्येचे 10 किंवा त्यापेक्षा जास्त बळी जात आहेत.
रूग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाणही कायम असून प्रतिदिन 500 च्या आसपास नवे कोरोनाबाधित सापडतात तर त्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा काही कमी प्रमाणात कोरोनातून बरे होत आहेत. बळी, कोरोनाबाधित सातत्याने वाढत असून ते कमी होण्याची किंवा थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.
प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण कमी
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असले तरी त्यामागे दुसरे कारण आहे, ते म्हणजे कोरोनाच्या तपासणीचे प्रमाण प्रतिदिन कमी होत आहे. अगोदर सुमारे 2000 किंवा त्यापेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी होत होती. आता ती संख्या प्रतिदिन कमी झाली असून 1500 किंवा त्यापेक्षा कमी लोकांची चाचणी होत आहे. पॉझिटिव्ह रूग्ण कमी मिळाले तरी कोरोनाचे बळी मात्र कमी होताना दिसत नाहीत.
गोव्यात आता सर्वजण मास्क लावून फिरतात तसेच सॅनिटायझरचाही वापर करतात तरी देखील नवे पॉझिटिव्ह रूग्ण व बळींची संख्या आटोक्यात येत नाही. राज्य सरकारला यावर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकाच कुटुंबातील किंवा शेजारील व्यक्तींमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसून येत आहे.
रविवारी कोरोनामुळे आठ बळी
रविवारी झालेल्या आठ बळींपैकी सात जणांचा मृत्यू गोमेकॉत झाला आणि एकाचा मृत्यू म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात (आझिलो) झाला. गोमेकॉत एकाच मृत्यू दाखल केल्यानंतर दहा मिनिटात झाला तर आझिलोतील रूग्णाचा मृत्यू एका तासानंतर झाल्याचे सांगण्यात आले.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी : डिचोली 114, सांखळी 253, पेडणे 170, वाळपई 176, म्हापसा 237, पणजी 172, हळदोणा 106, बेतकी 70, कांदोळी 229, कासारवर्णे 62, कोलवाळ 105, खोर्ली 186, चिंबल 286, शिवोली 185, पर्वरी 298, मये 31, कुडचडे 113, काणकोण 130, मडगाव 297, वास्को 263, बाळ्ळी 63, कासावली 96, चिंचिणी 32, कुठ्ठाळी 149, कुडतरी 69, लोटली 64, मडकई 61, केपे 110, सांगे 100, शिरोडा 41, धारबांदोडा 73, फोंडा 234, नावेली 81. गोव्यात विविध मार्गाने प्रवासी येत असून त्यातील एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे.
11 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण रूग्ण 38366
11 ऑक्टोबरपर्यंत बरे झालेले रूग्ण 33203
सध्याचे सक्रिय रुग्ण 4656
11 ऑक्टोबर रोजीचे नवे रूग्ण 432
11 ऑक्टोबर रोजी बरे झालेले रूग्ण 426
11 ऑक्टोबर रोजी कोरोना बळी 8 11 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण बळी 507