दिवसभरात 1209 बाधित, 31 बळीतब्बल 2160 जणझालेकोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या कहरानंतर राज्यात लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूचे परिणाम सकारात्मक दिसून येऊ लागले असून बाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातूनच गेल्या आठवडय़ाभरापासून बाधितांची संख्या बरीच कमी झाली असून सक्रीय रुग्णसंख्याही झपाटय़ाने उतरत आहे, तर कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात बुधवारी 1209 बाधित सापडले तर 2160 जण बरे झाले आहेत. त्याशिवाय गत आठवडय़ात तब्बल 32 हजार पार गेलेली सक्रिय रुग्णसंख्या सध्या 22964 एवढी झाली आहे. गत 24 तासात 31 जण दगावले आहेत. गत 24 तासात 209 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 976 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपासून आतापर्यंतच्या बळींची संख्या 2228 वर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 139985 एवढी झाली असून त्यातील 114793 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के झाले आहे.
बुधवारी बळी गेलेल्या 31 जणांमधील 18 मृत्यू गोमेकॉत झाले आहेत. दक्षिण जिल्हा इस्पितळात 12 व उत्तर गोवा खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे.