जिल्हय़ात आलेल्या चाकरमान्यांची संख्या साडेसहा हजारावर : एका दिवसात एक हजार चाकरमानी दाखल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुरुवारी नव्याने सापडलेल्या तीन कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन एकूण 38 व्यक्ती संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर कोरोना बाधित आठवा रुग्ण सापडलेल्या नेरुर-शिरसोसवाडी परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढतच असून गुरुवारी एका दिवसात 1,074 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले. त्यामुळे जिल्हय़ात आलेल्या चाकरमान्यांची संख्या 6 हजार 470 वर पोहोचली आहे, अशीही माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुरुवारी एकूण तीन कोरोना बाधित रुग्ण नव्याने सापडले. त्यामुळे जिल्हय़ाची कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. मात्र त्यातील चार रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना बाधित उर्वरित चार रुग्णांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात गुरुवारी सापडलेल्या तीन कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाडा-देवगड येथील 21 वर्षीय एक व 23 वर्षीय एक अशा दोन युवती कोरोना बाधित सापडल्या, तर वाशी-मुंबई येथून आंबा वाहतूक करून आलेला नेरुर-शिरसोसवाडी येथील 23 वर्षीय युवक कोरोना बाधित सापडला होता.
यापूर्वी 11 मे रोजी वाडा येथे 51 वर्षीय कोरोना बाधित महिला आढळली होती. या महिलेच्या संपर्कातील दोन्ही कोरोना बाधित या तिच्याच मुली असून त्या क्वारंटाईनमध्ये होत्या. 21 व 24 वषीय या दोन्ही युवतींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यात आला. यातील सहाव्या रुग्णाच्या संपर्कात एकूण 15 व्यक्ती आल्या असून त्यापैकी 12 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून तीन व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. सातव्या रुग्णाच्या संपर्कात एकूण 13 व्यक्ती आल्या आहेत. त्यापैकी 11 अतिजोखमीच्या संपर्कातील असून दोन व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून तपासणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात येत आहेत. तसेच आणखी एक आठवा कोरोना बाधित रुग्ण हा कुडाळ नेरुर-शिरसोसवाडी येथील आहे.
नेरुर-शिरसोसवाडी येथील 23 वर्षीय रुग्णाने 25 एप्रिल ते 6 मे या दरम्यान आंबा वाहतुकीचे काम केले. वाशी, मुंबई येथून आंबा वाहतूक करून आल्यानंतर 6 मे 2020 रोजी त्याला नेरुर येथील शाळेमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. 11 मे 2020 रोजी या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 10 व्यक्ती आल्या असून त्यापैकी पाच व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील असून पाच व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्वांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. नेरुर या त्याच्या गावी कंटेनमेंट झोन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
82 जणांचे नमुने कोरोना तपासणीला पाठविले
सद्यस्थितीत जिल्हय़ात एकूण 1 हजार 174 व्यक्ती अलगीकरणात असून 708 व्यक्ती गृह अलगीकरणात, तर 466 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 949 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 867 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 859 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 82 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 103 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शुक्रवारी 6 हजार 163 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ात आढळलेल्या आठ कोरोना बाधीत रुग्णांपैकी सहा रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यात जाण्यासाठी 4,083 जणांना पास
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून महाराष्ट्राच्या इतर जिल्हय़ांमध्ये जाण्यासाठी 697 पासेस, तर परराज्यात जाण्यासाठी एकूण 4083 पास देण्यात आले आहेत. यामध्ये गुरुवारी श्रमिक विषेश रेल्वेने कर्नाटकात रवाना झालेल्या कामगार व मजुरांचा व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
एका दिवसात 1,074 व्यक्ती जिल्हय़ात दाखल
सिंधुदुर्ग जिल्हय़ात चाकरमान्यांचा ओघ सुरुच असून जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्टवर तीन ते चार किलोमीटर लागलेल्या लांबच लांब गाडय़ांच्या रांगा यातून जिल्हय़ात येणाऱया लोकांचा ओघ सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिनांक 14 मे रोजी एका दिवसात 1 हजार 74 व्यक्ती दाखल झाल्या असून शुक्रवारी अखेर जिल्हय़ात एकूण 6 हजार 470 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
घरीच अलगीकरण 0708
संस्थात्मक अलगीकरण 0466
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0949
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0867
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0008
निगेटिव्ह आलेले नमुने 0859
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0082
विलगीकरण कक्षात दाखल 0103
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0004
शुक्रवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 6163