प्रतिनिधी/ वास्को
वास्कोत वाढत चाललेला कोरोनाचा प्रसार तसेच होणाऱया वाढत्या मृत्यूंमुळे स्थानिक लोकांना मदतीची गरज भासू लागलेली असून असंख्य कुटुंबांसमोर या महामारीमुळे प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. त्यांना मदतीची, मार्गदर्शन व धीर देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या पाश्वभूमीवर काल मंगळवारी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी शासकीय अधिकाऱयांसमवेत बैठक घेऊन कोरोनासंबंधीत मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला मुरगावचे उपज्ल्हाधिकारी सचिन देसाई, मुख्याधिकारी जयंत तारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, काही नगरसेवक तसेच समाजसेवक हजर होते. कोरोनाने निर्माण केलेल्या कठीण परिस्थितीच्या काळात लोकांना मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे या बैठकीचा मुख्य हेतू होता. उपजिल्हाधिकाऱयांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून कोरोना बाधीत व त्यांच्या कुटुबियांना वाहन सेवा पुरवणे, कॉरंन्टाईन सेवा पुरवणे किंवा अन्य अडचणीवर मार्गदर्शन तसेच मदत या नियंत्रण कक्षाव्दारे करण्यात येणार आहे.
कोरोना बाधीतांच्या सेवेसाठी समाजसेवकांकडून रूग्ण वाहिका उपलब्ध
दरम्यान, वास्को परिसरात सध्या अनेक समाजसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. कोविड रूग्णांना अन्न सेवा तसेच वाहन सेवा उपलब्ध करण्याकडे अनेक जण वळले आहेत. चिखलीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव यांनी आपले खासगी वाहन चिखली हॉस्पिटलच्या सेवेसाठी दिलेले आहे. हॉस्पिटलतर्फे या वाहनाचा उपयोग रूग्णवाहिका म्हणून करण्यात येणार आहे. मांगोरहिल येथील एक क्रीडापटू लल्ला यादव यानीही आपली गाडी कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी स्थानिक नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स यांच्या स्वाधीन केली आहे. तसेच वेलसावचे माजी सरपंच रोकोझिन डिसोजा यांनीही कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी दोन रूग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत.