प्रतिनिधी/ कुडाळ
एकीकडे आई कोरोना बाधित झाल्याने ती उपचारासाठी दवाखान्यात असताना एका 16 वर्षीय मुलीला तिच्या दोन मैत्रिणी, एका मैत्रिणीची आई तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होत्या. तर एका युवकाने तुझी आई क्वारंटाईन आहे, रात्री दार उघडे ठेव, तुझ्याकडे झोपायला येतो असा फोन केला होता. या सर्व प्रकारातून शेवटी मुलीने विषारी औषध पिले आणि उपचार सुरु असताना तिचा दुर्देवी मृत्यूही घडला. या प्रकारानंतर आता तिच्या आईने तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱया दोन मैत्रिणी, एका मैत्रिणीची आई व एका युवकाविरुध्द तक्रार दाखल केलीय.
याबाबत मुलीची आई कमल चंद्रकांत पवार वय (32) रा. कुंभारवाडा, ता. जावली यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 3 सप्टेंबर रोजी त्या कोरोना बाधित झाल्या. त्यामुळे त्यांना रायगाव (ता. जावली) येथे क्वारंटाईन करण्यात आले. त्या कुंभारवाडय़ात भाडय़ाने खोली घेवून रहात होत्या. त्या क्वारंटाईन झाल्यावर त्यांची दहावीत शिकणारी मुलगी तनुजा चंद्रकांत पवार (वय 16) ही एकटीच खोलीत रहात होती.
कमल पवार कोरोनामुक्त होवून घरी आल्या. मात्र त्यांची तब्बेत तशी ठीक नव्हती. त्यांची मुलगी मात्र नाराज रहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी दि. 30 सप्टेंबर रोजी त्यांनी मुलीला विचारले. त्यावेळी तिने तिच्या मैत्रिणी श्रध्दा सुभाष जवळ व आर्या जवळ (पूर्ण नाव माहिती) या दोघींनी तिच्याशी भांडणे काढून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले असल्याचे सांगितले. तुझी सगळी लफडी आम्हांला माहिती असून तुला सोडणार नाही, अशी धमकी श्रध्दा व आर्या या दोघींनी दिली असल्याचे सांगितले.
तसेच ज्या दिवशी कमल पवार क्वारंटाईन झाल्या होत्या. त्या दिवशी कुंभारवाडा येथील शरद विष्णू जवळ याने त्याच्या मोबाईलवरुन तनुजाला फोन केला होता. तुझी आई घरी नाही. रात्री दरवाजा उघडा ठेव मी झोपायला येतोय तुझ्याजवळ, असे फोनवरुन तनुजाला म्हणाला होता. ही बाब देखील तनुजाने आईला सांगितली होती.
दरम्यान, दि. 30 सप्टेंबर रोजी त्याबाबत या भांडणाचा जाब विचारण्यास कमल पवार या श्रध्दा जवळ हिच्या घरी गेल्या. त्यावेळी श्रध्दाची आई संगिता सुभाष जवळ व आर्याही होती. पवार यांनी त्यांना तुमच्या मुली तनुजाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला टॉर्चर करत असल्याचे सांगितले. त्यावेळी संगिता जवळ यांनी त्यांचा अपमान करत उलट तनुजाच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले. त्यावेळी तनुजाही तिथे होती. घरी आल्यावर तनुजाच्या मनावर याचा खूप परिणाम झाल्याने ती आता मी मरुन जाते असे म्हणत लागली. कमल पवार यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दि. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 7.30 वाजता तनुजा बाहेरुन घरात आल्यावर सोफ्यावर झोपली. त्यावेळी तिच्या तोंडातून फेस येत होता. त्यावेळी गावातील लोकांच्या मदतीने तिला प्रथम मेढय़ात, नंतर साताऱयातील हॉस्पिटलमध्ये नेले. नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री सव्वा नऊ वाजता तिचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरल्यानंतर दि. 10 रोजी कमल पवार यांनी श्रध्दा सुभाष जवळ, आर्या जवळ, संगिता सुभाष जवळ तसेच शरद विष्णू जवळ यांच्यामुळेच तनुजाने आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल केली.