केवळ 20 दिवसात 1 हजार नव्या रूग्णांची भर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
बुधवारी सकाळी आणखी 20 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने 2 हजारांचा टप्पा पार केला आहे. नव्या रूग्णांमध्ये रत्नागिरी 17 तर 3 ऍन्टीजेन चाचणीमधील तिघांचा समावेश आहे. जिल्हय़ातील पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 2012 इतकी झाली आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. केवळ 20 दिवसांत जिल्हय़ात 1 हजार रूग्ण वाढले आहेत. 15 जुलै रोजी 1 हजार रूग्णसंख्या असलेल्या जिल्हय़ाने 5 ऑगस्ट रोजी 2 हजारांचा टप्पा पार केला आहे. रूग्णवाढीच्या या वेगामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर अधिकच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रत्नागिरीत तालुक्यात बुधवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार 17 नवे रूग्ण सापडले आहेत. यात नाचणे येथील एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याशिवाय थिबा पॅलेस परिसरात पुन्हा तीन रूग्ण सापडले आहेत. तसेच आठवडा बाजार, प्रतिभा वसतिगृह, कारवांचीवाडी, आंबेशेत, आरोग्य मंदिर, गोळप येथे प्रत्येकी एक तर नाचणे आयटीआय क्वारंटाईन केंद्र येथे 2 नवे रूग्ण सापडले आहेत.
22 जण कोरोनामुक्त
बुधवारी 22 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1357 झाली आहे. बरे झालेल्यांमध्ये माटे हॉल चिपळूण 1, समाजकल्याण मधील 6, घरडा 12 आणि कामथे येथील तिघांचा समावेश आहे.
16 हजारपेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 18 हजार 941 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 545 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2012 अहवाल पॉजिटीव्ह तर 16 हजार 522 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 396 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.