कोरोनाच्या भीतीने पोटच्या मुलाचा आईचा मृतदेह घेण्यास नकार
शहर वार्ताहर / राजापूर
मुलीकडे गेलेल्या वृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला असेल, या संशयाने भावकीने नकार देताच मुलानेही आईचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याची घटना राजापूर तालुक्यातील एका गावात घडली. खुद्द आपल्या जन्मदात्या आई&चाच मृतदेह नाकारल्याने कोरोनामुळे माणुसकीच हरवत चालल्याचा अनुभव येत आहे. या गंभीर प्रकाराची चर्चा त्यानंतर सर्वत्र सुरू होती.
तालुक्यातील एक वृध्द महिला नजीक दिलेल्या आपल्या मुलीकडे रहावयास गेली. चार दिवस होताच अचानक ह्य्दयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी मुलीच्या सासरच्या मंडळीने तिच्या माहेरी ही बाब कळविली व मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. ही बाब त्या वृध्द महिलेच्या मुलाने आपल्या भावकीला सांगितली. मात्र कोरोना महामारी जोरात असल्याने भावकीने यावर विचारविनीमय करण्यास सुरूवात केली. यावेळी त्या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाला असावा, असा संशय व्यक्त करत मृतदेह आणण्यास नकार देत मुलीच्या गावाकडेच त्या महिलेला अग्नी देण्यात यावा, असे ठरवण्यात आले. मात्र आपल्या गावामध्ये घेण्यास नकार दिला. यावेळी मुलगाही त्यांच्यामध्ये सामील झाला व मुलीच्या गावाकडे जाऊन अग्नी देण्यास तयार झाला.
मुलीच्या सासरकडील मंडळीनी गावात अग्नी देण्यास नकार दिला. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. यावेळी ही बाब पोलीस पाटीलांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस पाटीलांनी मुलाकडे रात्री 10 वा. जात सुमारे 2.30 वाजेपर्यत समजावून सांगितले. त्यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुलाकडील मंडळी तयार झाली. मात्र पुन्हा पहाटे 5.30 च्या दरम्यान पोलीस पाटीलांना फोन करून नकार कळविला व त्या मृत महिलेची कोरोना टेस्ट करावी म्हणून सांगितले. शेवटी पोलीस पाटलांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला व चर्चा केली. मृत व्यक्तीची अर्धा तासाच्या आत कोरोना टेस्ट करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून मृत व्यक्तीला पीपीई किट घालून संबंधित व्यक्तीच्या ताब्यात मृतदेह देण्याची सूचना केली व त्या मुलालाही पीपीई किट घालून अग्नी देण्यास तयार करावे, असे सांगितले.
पोलीस पाटीलांनी ही बाब त्या मुलाच्या कानावर घातली व मुलाने या संदर्भात भावकीचा होकार घेत मृतदेह आपल्या गावात आणण्यास सांगितला. अखेर दुसऱया दिवशी दुपारी 1 वा.च्या दरम्यान त्या मृत महिलेला पीपीई किट घालून मूळ गावात मृतदेह नेऊन अग्नी देण्यात आला. मुलानेही पीपीई किट घालून आपल्या आईला भावकीच्या सांगण्यावरून कोरोना झाला, असे समजून पीपीई किट घालून अग्नी दिला. मात्र इथे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मुलाला आपल्या आईपेक्षा भावकी मोठी वाटल्याने भावकीच्या नकारावरून आपल्या आईचा मृतदेह घेण्यास नकार दिला. यावरून खरंच या कोरोनामुळे माणुसकीही हरवत चालली आहे का, असा प्रश्न पडला तर काही नवल नाही.
औषधांअभावी वृध्देला ह्य्दयविकाराचा झटका?
त्या वृध्द महिलेला उच्च रक्तदाबाची औषधे चालू होती. मात्र ती औषधे संपली होती व जावयाकडे कसे मागणार, यामुळे तिने 4 दिवस औषधे घेतली नसल्याने तिला ह्य्दयविकाराचा झटका आला असावा व त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष यावेळी उपस्थितांमधून काढण्यात आला. मात्र यामुळे तालुक्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे.