- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.1 टक्क्यांवर!
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच काल महाराष्ट्रातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी राज्यात 46 हजार 781 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 58 हजार 805 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी ही संख्या 71 हजार 966 इतकी होती. तर निदान झालेल्या रुग्णांची संख्या 40 हजार 956 इतकी होती.
दरम्यान, कालच्या दिवशी 816 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 52 लाख 26 हजार 710 वर पोहचली आहे. यातील 46 लाख 00 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 78 हजार 007 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01% आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 46 हजार 129 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 01 लाख 00 हजार 958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52 लाख 26 हजार 710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36 लाख 13 हजार 000 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 29 हजार 417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 46 हजार 129 इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे सर्वाधिक म्हणजेच 1 लाख 03 हजार 067 इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 36 हजार 595 इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 31 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 49 हजार 345 इतकी झाली आहे. आणि नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 788 इतकी आहे.