ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नवे स्पंज कण विकसित केले आहेत. हे स्पंज कण फुफ्फुस आणि रोगप्रतिकारकशक्तीच्या पेशींसोबत बनवण्यात आले आहेत. या स्पंज कणांमुळे विषाणूची संक्रमित होण्याची क्षमता 90 टक्क्यांपर्यंत कमी होते.
संशोधक लियानफँग झांग म्हणाले, कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेले स्पंज कण फुफ्फुस आणि रोगप्रतिकारक पेशींना व्यापतात. हे स्पंज कण मानवी केसांच्या रुंदीच्या तीस पट बारीक आहेत. हे नॅनोस्पंज कोविड-19 च्या विषाणूला आपल्याकडे आकर्षित करून त्यामधील हानिकारक घटक शोषतात.
नॅनोस्पंजमुळे कोरोना विषाणू निष्क्रिय होतात. त्यामुळे मानवाच्या पेशीमध्ये त्याचे संक्रमण होत नाही, असेही झांग यांनी सांगितले.