डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह कुटुंबातील तब्बल चौदा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह : सतरा दिवस शारीरिक, मानसिक त्रासाला गेले सामोरे
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोविडच्या महामारीत सामान्य रुग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरनाही अतिशय कठीण प्रसंगांना सामोर जावे लागत आहे. सध्याच्या या संकटात देवदूत बनून काम करणाऱया या डॉक्टरना देखील बऱयाचवेळा जनतेच्या रोषाचा बळी व्हावं लागत आहे. डॉक्टर हा देखील माणूस आहे. त्याला देखील जगण्याचा हक्क आहे. त्यालाही तुमच्या-आमच्यासारखीच कुटुंबाची काळजी असते, त्याला देखील टेन्शन असतं, थकवा असतो. कोरोनाच्या या महामारीत डॉक्टरांवरही कशी संकटे कोसळली, हे जाणून घ्यायचे असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयाचे निवासी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यावर कोसळलेला प्रसंग जाणून घेणे गरजेचे आहे.
जिल्हा कोविड रुग्णालयात निवासी उपजिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया डॉ. पाटील यांच्याकडे कोविड वॉर्डमधील रुग्णांची विचारपूस करणे, या वॉर्डमधील डॉक्टर, सिस्टर आणि अन्य व्यवस्थेचे नियोजन करणे तसेच हॉस्पिटलमध्ये अन्य कामासाठी भेटण्यास येणाऱया अभ्यागतांशी संपर्क ठेवणे आदी महत्वाच्या जबाबदाऱया आहेत. जिल्हय़ात कोविडचे रुग्ण सापडू लागल्यापासून एकही दिवस रजा न घेता डॉ. पाटील डय़ुटी बजावत होते. ही डय़ुटी बजावत असतानाच त्यांचे लातूर येथे राहणारे 83 वर्षाचे वडील आणि 80 वर्षाची आई व भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह ठरली. त्यांना तातडीने सोलापूर येथील कोविड इस्पितळात दाखल करावे लागले. आई-वडील वृद्ध असल्यामुळे डॉ. पाटील खूप टेन्शनमध्ये आले होते. तर लातूर येथून त्यांचे वडील आणि आई भेटायला ये म्हणून निरोप पाठवत होते. अशा प्रसंगात काय करावे, हे डॉ. पाटील यांना सूचत नव्हते. इकडची डय़ुटी सोडून जाणं हे देखील त्यांच्या मनाला पटत नव्हते. तर आई-बाबांनाही त्यांना भेटायचे होते.
सर्व कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह
याच दरम्यान 27 रोजी डॉ. पाटील यांच्या कुटुंबावर आणखी एक आघात झाला. डॉ. पाटील यांच्या पत्नी डॉ. सौ. विशाखा पाटील यांच्या माहेरचे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आले. यामध्येच डॉ. विशाखा यांच्या आईचे निधन झाले. सासूबाईंच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि पत्नीला माहेरी सोडण्यासाठीची तयारी करीत असतानाच डॉ. श्रीपाद पाटील यांची तब्येत अचानक खालावली. त्यांनी ताबडतोब टेस्ट करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली. लागोपाठ पत्नी डॉ. विशाखा याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या. सुदैवाने मुलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अनपेक्षित या घटनेने डॉ. पाटील यांना सासूरवाडीचा दौरा रद्द करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले.
सुदैवाने सुखरुप संकटातून बाहेर
याच दरम्यान हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी व डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी डॉ. पाटील यांचे मालवण येथील डेन्टिस असलेले भाऊ कुटुंबियासह डॉ. विशाखा यांचे सांत्वन करण्यासाठी कुडाळात त्यांच्या घरी पोहोचले आणि त्याचवेळी त्यांनाही कोरोनाची लागण झाली. अखेर डॉ. श्रीपाद पाटील यांनी लातूरलाच जाऊन आई-बाबांसोबत तेथील इस्पितळात ऍडमिट होण्याचा निर्णय घेतला. यामागचा उद्देशही असा होता की, इस्पितळात स्वत: उपचार घेत असताना आई-बाबांची सुद्धा सेवा करता यावी. त्यानुसार डॉ. श्रीपाद पाटील, पत्नी डॉ. मनिषा पाटील तसेच मालवण येथील त्यांचे पॉझिटिव्ह आलेले भाऊ व त्यांचे कुटुंबीय लातूरला पोहोचले. त्यांनी तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक वॉर्डच बूक केला. वॉर्डमध्ये एकाच कुटुंबातील एकूण 14 जणांना दाखल व्हावे लागले. एकमेकांना मानसिक आधार देत आणि योग्य उपचार घेत सर्वजण या कोरोनाच्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडले.
एकूणच या कोरोनाच्या महामारीत प्रत्येकजण जीव धोक्यात घालून आपलं योगदान देत आहे. डॉक्टर मंडळी तर यात आघाडीवर आहेत. डॉ. पाटील यांनी कोरोनावर मात करीत पुन्हा एकदा रुग्ण सेवेची जबाबदारी स्वीकारून जे धारिष्टय़ दाखविले आहे, त्याबाबत त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
रुग्णसेवेला देणार प्राधान्य – डॉ. श्रीपाद पाटील
अलिकडेच काही दिवसांपूर्वी डॉ. पाटील पुन्हा एकदा जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘मी व माझे सर्व कुटूंबिय कोविडच्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडलो. पण या दरम्यानच्या काळात आम्हा सर्वांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला तोंड द्यावे लागले. अजूनही शारीरिक थकवा जाणवत आहे. मात्र काहीही असले तरी मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या दृष्टीने माझ्याकडे येणाऱया रुग्णांची आरोग्याची काळजी घेणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मी आणि पत्नी पुन्हा रुग्ण सेवेत रुजू झालो आहोत. माझ्याकडे कोविडचीच जबाबदारी आहे. मला माहित आहे, ही जबाबदारी सांभाळत असताना माझ्यावर पुन्हा एकदा या कोविडची आपत्ती कोसळू शकते. मात्र तरी देखील हा धोका पत्करत जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली आहे. केवळ मीच नव्हे तर माझे सहकारी डॉक्टर देखील अशाच प्रकारच्या संकटांना तोंड देत रुग्ण सेवा देत आहेत’, असे ते म्हणाले.