अथणी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी – कोरोना मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन
वार्ताहर/ अथणी
अथणी विधानसभा मतदारसंघात कोरोनाने दगावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी अथणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. मतदारसंघात अथणी काँग्रेसकडून कोरोना मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते गजानन मंगसुळी यांच्यासह कार्यकर्ते तालुक्यातील तेलसंग, ककमरी, कोकटनूर, सत्ती, सवदी, बन्नूर आदी गावांना भेटी देऊन तेथील कोरोना मृतांच्या नातेवाईकांना आधार देत शासकीय मदत मिळवून देण्याचे सांगितले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ शिंगे यांनी, कोरोना काळात लॉकडाऊनचा फटका, गमावलेला रोजगार आणि कोरोनाची लागण यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेक बाधितांचा मृत्यू झाल्याने ती कुटुंबे निराधार झाली आहेत. अशा कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाखाचे अर्थसाहाय्य करून त्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली. यावेळी अनिल सुनडोळी, सत्याप्पा बाग्यान्नवर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हल्याळ येथील बनसोडे कुटुंबियातील चौघा भावांचा कृष्णानदीत बुडून मृत्यू झाला. यामुळे बनसोडे कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले आहे. याची दखल घेत राज्य शासनाने बनसोडे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गजानन मंगसुळी यांनी दिला.