मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची माहिती : साठ वर्षावरील लोकांनी बुस्टर डोस घ्यावा,राजकीय पक्षांनी निर्बधांचे पालन करावे
प्रतिनिधी /पणजी
कोरोनामुळे मृत झालेल्या बहुसंख्य लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला असून सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या 16 कोरोना रुग्णांपैकी 13 जणांनी कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना व्यवस्थापन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, अनेकजण कोरोनाबाधित झाले तरी त्यांनी कोरोनाचे साहित्य नेण्यास टाळाटाळ केली आहे तर अनेकजण कोरोना चाचणीसाठी येतच नाहीत. वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्यांनी व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या सध्याच्या तिसऱया लाटेत लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याने, राज्य सरकारने लाभार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, सध्याच्या लाटेत कोविडशी संबंधित बहुतेक मृत्यूंमध्ये लसीकरण न झालेल्या लोकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला कोविडचा आढावा
राज्य लसीकरण अधिकाऱयांनुसार, गोव्यात पात्र लोकसंख्येपैकी 98 टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तथापि, बूस्टर जॅबला मिळालेला प्रतिसाद फारच कमी आहे, कारण आतापर्यंत फक्त 10 टक्के लोकांनी शॉट घेतला आहे. काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव, डीन जीएमसी, संचालक आरोग्य आणि लसीकरण अधिकारी यांच्यासह कोविड आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
राजकीय पक्षांनी निर्बंधांचे पालन करावे
राज्यातील सर्व राजकीय पक्षांना मुख्यमंत्र्यांनी वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग (इसीआय) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने घातलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करण्याची विनंती केली आहे.
लसीकरण वाढण्याची गरज : डॉ. बोरकर
लसीकरणाबाबत, लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले की, आतापर्यंत केवळ 10 टक्के पात्र लोकसंख्येने त्यांचा बूस्टर जॅब घेतला आहे, ज्यात बहुसंख्य ज्ये÷ नागरिक आहेत. आघाडीवरचे आरोग्य कर्मचारी पुढे येत नाहीत. 110 टक्के लाभार्थ्यांना एक लस लागली आहे. तसेच, 15-18 वर्षे वयोगटातील 75 टक्के मुलांनी त्यांचा पहिला लसीचा शॉट घेतला आहे.
जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, जीएमसीने लसीकरण न केलेले रुग्ण ओळखण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांनी लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे.
भाजपचे उमेदवार आज होणार जाहीर
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक आज बुधवार दि. 19 जानेवारी रोजी दिल्ली येथे होत असून त्यात गोव्यातील भाजप उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येणार आहेत. ती आजच जाहीर केली जातील, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. डॉ. सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, सतीश धोंड, सी. टी. रवी हे भाजपचे नेते दिल्लीत पोहोचले असून तेथील बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती भाजप सुत्रांनी दिली.