ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संसर्गाने आता पतंजली संस्थेत देखील शिरकाव केला आहे. बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील बन्सल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल यांना मागील काही दिवसांपासून सर्दी-ताप येत असल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोना संसर्ग त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोहचला होता. प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर 19 मे रोजी त्यांचे निधन झाले.
सुनील बन्सल यांच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
- 2018 पासून बन्सल यांच्या हाती पतंजली डेअरी व्यवसायाची सूत्रे
सुनील बन्सल यांनी 2018 मध्ये पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यांच्याच सल्ल्यानुसार कंपनीने दूध, दही, ताक आणि पनीरसहीत इतर डेअरी प्रोडक्ट बाजारात आणली होती.