ऑनलाईन टीम / पुणे :
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता घटस्थापनेने झाला. कोरोनायोद्धे असलेल्या स्त्री रोगतज्ञ डॉ.क्षमा उपलेंचवार व नेत्ररोगतज्ञ डॉ.निलेश उपलेंचवार आणि नागपूर येथील प्रा. चारु शंतनु गोयल यांच्या हस्ते पूजन पार पडले. भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांचे हित घेता यंदाचा उत्सव साधेपणाने करण्यात येत आहे. मंदिरात मोजक्या विश्वस्तांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापनेचा सोहळा साध्या पद्धतीने झाला.
यावेळी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते. दुपारी 12 वाजता आरतीने प्रतिष्ठापना सोहळ्याचा समारोप झाला. देवीसमोर सफरचंदाच्या फळांचा भोग लावण्यात आला होता.
प्रशासनाच्या सर्व सूचनांनुसार खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात सुरक्षितेच्या दृष्टीने सी.सी. टी.व्ही.ची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मंदिरामध्ये ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार असून विविध सामाजिक उपक्रमांवर देखील भर देण्यात येणार आहे. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता व श्री महाकाली माता यांच्या चरणी कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.