मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, भारतीय लस पूर्णतः सुरक्षित
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाविरूद्धच्या युद्धात आघाडीवर असणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व इतर अनेक जणांचे लसीकरण सरकारी खर्चाने केले जाईल. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही घोषणा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत केली. ही चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. भारतनिर्मिती लसी पूर्णतः सुरक्षित असून त्याच्यासंदर्भात शंका बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकार साधारणतः 3 कोटी लोकांना विनामूल्य कोरोना लस देणार आहे. आम्ही देशव्यापी लसीकरणाच्या एका ऐतिहासिक टप्प्यावर आहोत. आम्ही सर्व सज्जता केली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होत आहे. सरकार ज्यांना विनामूल्य लस देणार आहे, त्या व्यक्तींमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नाही. याचाच अर्थ त्यांना स्वतःच्या खर्चाने लस घ्यावी लागणार आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सर्व खरेदी केंद्राकडूनच
या लसीकरण कार्यक्रमासाठी लसीचे जे डोस खरेदी केले जाणार आहेत, त्यांची खरेदी केवळ केंद्र सरकारकडूनच होईल. खरेदी केलेली लस नंतर आवश्यक त्या स्थानी पाठविण्यात येणार आहे. लसीच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ही दक्षता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यांना महत्वपूर्ण सूचना
देशव्यापी लसीकरणाचा कार्यक्रम राज्यांच्या सहकार्याने हाती घेतला जात आहे. राज्य सरकारांनी या लसीसंबंधी त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये कोणतीही अफवा उठू नये आणि लोकांची दिशाभूल करण्यात येऊ नये याची दक्षता बाळगावी. अफवा आणि गैरसमज पसरविणाऱयांविरोधात कठोर कारवाई करावी. लसीकरणासाठी लोकांना उद्युक्त करणे आवश्यक असून त्यासाठी धार्मिक व सामाजिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. अनेक राज्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी महत्वाच्या आणि व्यवहार्य सूचना केल्या आहेत. केंद्र आणि राज्ये यांच्यात या संदर्भात होत असलेला संवाद आणि सहकार्य हे संघीय राज्यपद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हेच् सहकार्य सातत्याने अपेक्षित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पन्नाशीनंतरच्यांना प्राधान्य
पन्नाशीनंतरच्या वयाच्या लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या लोकांना इतर व्याधी आहेत, त्यांनाही लसीकरण कार्यक्रमात महत्व देण्यात येणार आहे. 50 वर्षांवरील लोकांची नावे व पत्ते समजण्यासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसूचीचा आधार घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सोपी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शंकांना उत्तरे
या कार्यक्रमात बहुतेक सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला. तसेच त्यांनी केंद्राच्या कार्यक्रमासंबंधी काही प्रश्नही विचारले. तसेच मतेही व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिल्याचे सांगण्यात आले. येत्या 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे.
भारताची लस वाजवी दरात
भारतात कोरोना विरोधातील लस यशस्वीरित्या बनविण्यात आली आहे. भारतीय लस वाजवी दरात उपलब्ध केली जाईल. तसेच ती भारतीय नागरीकांच्या आवश्यकता लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. आज जगातील अनेक देश या लसीची मागणी करीत आहेत. 9 देशांनी आतार्यंत लसीची मागणी केली आहे, अशीही महत्वाची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. तसेच भारतात तयार झालेली कोणतीही लस अतिशय सुरक्षित आहे. कोणीही त्यावर शंका अगर संशय व्यक्त करून नये, असे विश्वासपूर्ण प्रतिपादन त्यांनी चर्चेत केले.
आणखी 7 लसींवर काम
भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही एकच भारतीय लस नाही. याशिवाय अन्य सात लसींच्या निर्मितीवर काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात लसींचा तुटवडा पडणार नाही. नव्या लसी अधिक प्रभावी आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता असणाऱया असतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.