निपाणी : कोरोना संसर्गाच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. अशा काळात निपाणीसह परिसराला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी कोरोना योद्धय़ांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा दिली. हे सेवाकार्यच जनसामान्यांसाठी सुरक्षा कवच ठरले, असे प्रतिपादन नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी केले. निपाणी येथे के. पी. हायस्कूलनजीकच्या अंजुमन हॉलमध्ये रहमान फौंडेशन बेळगाव यांच्या माध्यमातून जनता क्लिनिकच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले होते. मान्यवरांसह डॉक्टर, कोरोना योद्धय़ांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. आयुक्त बोरण्णावर पुढे म्हणाले, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन नेहमीच जनतेच्या सुरक्षेसाठी पुढे येते. पण या सेवेला जर जनसामान्यांतून साथ मिळाली तर कोणतेही संकट दूर होण्याला वेळ लागत नाही. असाच काहीसा अनुभव गेल्या सहा महिन्यांत कोरोना संसर्ग आटोक्यात आणताना आला. प्रशासनाच्या सेवाकार्याला कोरोना योद्धय़ांची साथ मिळाल्यानेच कोरोना संसर्ग निपाणी भागात आटोक्यात आणण्यास मदत झाली. येत्या काळात कोरोनाचा समूळ नायनाट होईपर्यंत कोरोना योद्धय़ांनी सेवा देताना प्रशासनाला सहकार्य करावे. जनता क्लिनिकने कोरोना काळ सुरू झाल्यापासून नाममात्र शुल्क आकारताना सेवा दिली आहे. यामध्ये डॉ. आर. एस. जमादार, डॉ. देवगोंडा एल., डॉ. गुलरेझ फातिमा, डॉ. झियरुद्दीन गवस, डॉ. अयुब फरकुटे, डॉ. सलिम मुजावर, डॉ. नासिर आवटे, डॉ. फजल पिरजादे, डॉ. शबाना आवटे, डॉ. विनोद जाधव, डॉ. झेबा लष्करवाले, डॉ. आदम करनाजी, डॉ. रुक्साना बागवान यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. आयोजित मोफत आरोग्य तपासणी, उपचार, औषध सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे सांगितले.फाऊंडेशनच्या माध्यमातून जनता क्लिनिकने सामान्य जनतेसाठी चालविलेले आरोग्य सेवाकार्य महत्त्वपूर्ण आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सांगितले.
जागा देण्याची मागणी
जनता क्लिनिकने कोरोना काळापासून आरोग्य सेवा देण्याचे कार्य चालविले आहे. हे सेवाकार्य सामान्य, गरीब, कष्टकऱयांसाठी आधार ठरले आहे. हे सेवा कार्य अविरत ठेवले जाणार आहे. पण यासाठी जागेची अडचण होत आहे. याकरीता जनता क्लिनिक करीता नगरपालिकेने जागा देण्याची मागणी माजी सभापती जुबेर बागवान यांनी यावेळी बोलताना दिली.