राज्यात तब्बल 1013 सक्रिय रुग्ण : दिवसभरात तिघांचा बळी राज्यात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून सक्रिय रुग्णसंख्या 1000 पार झाली असून ती 1013 वर पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर 3 जणांचे बळी गेल्या 24 तासात गेले आहेत. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 818 झाला असून पणजी, मडगाव, फोंडा या तीन शहरातील कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे.
काल रविवारी 98 नवे रुग्ण सापडले तर 79 जण बरे होऊन घरी परतले. संशयित रुग्ण म्हणून 19 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 110 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने पुन्हा चिंता वाढून भीती पसरली आहे. राज्यात आतापर्यंत मिळून एकूण 56623 जणांना कोरोना बाधला होता, त्यातील 54792 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 16, सांखळी 16, पेडणे 25, वाळपई 11, म्हापसा 50, पणजी 123, हळदोणा 12, बेतकी 9, कांदोळी 62, कासारवर्णे 3, कोलवाळ 11, खोर्ली 22, चिंबल 37, शिवोली 30, पर्वरी 54, मये 5, कुडचडे 8, काणकोण 8, मडगांव 102, वास्को 62, बाळ्ळी 8, कासावली 59, चिंचिणी 30, कुठ्ठाळी 50, कुडतरी 8, लोटली 17, मडकई 6, केपे 9, सांगे 5, शिरोडा 5, धारबांदोडा 16, फोंडा 107, नावेली 24. कासावली, कुठ्ठाळी, वास्को, पर्वरी, कांदोळी, म्हापसा येथे 50 आणि त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
- 21 मार्चपर्यंतचे रुग्ण 56623
- बरे झालेले रुग्ण 54792
- सक्रिय रुग्ण 1013
- 21 मार्चचे नवीन रुग्ण 98
- 21 मार्चचे बरे झालेले रुग्ण 79
- 21 मार्चचे बळी 3
- एकूण बळी 818
नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई : आरोग्यमंत्री
गोव्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी चिंता प्रकट केली असून कोरोना नियम, अटी, एसओपीचे पालन सर्वांनी कडकपणे करावे असे आवाहन केले आहे. नाहीतर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. मास्क परिधान करणे बंधनकारक असून सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. राज्यात येणाऱया सर्व पर्यटकांनी कोरोनाचे नियम – अटी पाळाव्यात, अशी सूचनाही राणे यांनी केली आहे. पालन न केल्यास कारवाई करणार असल्याचे बजावले आहे.
फोंडय़ात झपाटय़ाने होतोय फैलाव
फोंडा तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा पुन्हा झपाटय़ाने वाढू लागला आहे. रविवार प्रसिद्ध झालेल्या मेडिकल बुलेटिनच्या आकडेवारीनुसार फोंडा तालुक्यात तब्बल 127 पर्यंत हा आकडा पोचला आहे. मातृछायेच्या ढवळी येथील मुलींच्या आश्रमात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आश्रमाची इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. तसा आदेश दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेला आहे.
मातृछायेच्या बालिका कल्याण आश्रमात 45 मुली व 17 कर्मचाऱयांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे सर्वजण असिम्प्टोमेटिक आहेत. काही जाणांचे चाचणी अहवाल अद्याप आलेले नाहीत. सर्व कोरोनाबाधीत रुग्णांना मातृछायेच्या इमारतीमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले असून तेथेच त्यांना उपचार दिले जात आहेत.
फोंडा तालुक्यातील रामनाथी व बांदोडा भागात गेल्या आठवडय़ात एकाच कुटुंबातील काही लोक कोरोनाबाधीत आढळून आल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या फोंडा आरोग्यक्षेत्राच्या हद्दीत 107, बेतकी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 9, मडकईच्या कार्यक्षेत्रात 6 तर शिरोडय़ात 5 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. याशिवाय शेजारील धारबांदोडा भागात 16 सक्रीय रुग्ण आहेत. फोंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने कोरोना रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांना पुन्हा सतर्क होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.