शनिवारी 48 पॉझिटिव्ह रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 288 वर
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच आहे. शनिवारी जिह्यातील 48 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांची संख्या 25 हजार 802 वर पोहोचली आहे. शनिवारी रात्री जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 288 इतकी आहे.
आतापर्यंत 25 हजार 173 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 3 हजार 50 हून अधिक स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. दुसऱया दिवशीही ग्रामीण भागापेक्षा एका बेळगाव शहरातील 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व उपनगरांत रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे.
टिळकवाडी, रुक्मिणीनगर, जाधवनगर, कॅम्प, वडगाव, शहापूर, देवराज अर्स कॉलनी, सदाशिवनगर, बसव कॉलनी, काळी आमराई, भाग्यनगर, शिवबसवनगर, हिंडलगा, कंग्राळी परिसरात शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सीआरपीएफचा एक जवान व बिम्समधील कर्मचाऱयालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
आतापर्यंत 3 लाख 1 हजार 430 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 70 हजार 954 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 38 हजार 247 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 341 जणांचा मृत्यू झाला आहे.