ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार रुग्णांच्या डिस्चार्जच्या आणि विलगीकरणाच्या नियमात बदल करण्यात येणार आहेत.
सध्या सर्व बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देताना RT-PCR टेस्ट करण्यात येते. मात्र, आता या नियमात आता बदल करण्यात आला असून, गंभीर लक्षणे असलेल्याच रुग्णांची पुन्हा चाचणी करण्यात येईल. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी झाली आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा रुग्णांना 14 ऐवजी 10 दिवसांनंतर RT PCR टेस्ट न करता डिस्चार्ज दिला जाणार आहे.
मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनवर ठेवण्यात येईल. 3 दिवसांपर्यंत त्यांचा ताप उतरला आणि पुढील 4 दिवस ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्यांपेक्षा जास्त झाली तर अशा रूग्णांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाईल.
कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी सलग 3 दिवस नियंत्रणात राहिल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. अन्यथा त्याची RT-PCR टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये म्हटले आहे