प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोरोना रुग्णांना सर्वोत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे. अनेक रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी येत असल्याने त्यांना वाचवणे अशक्य होत असून बळी वाढत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. बळी जाणाऱया रुग्णांची माहिती देणारे विशेष बुलेटीन प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनाची वस्तुस्थिती, वाढणारे रुग्ण, बळी यांचा आढावा घेण्यासाठी राणे यांनी काल शुक्रवारी डॉक्टर्ससह आरोग्याधिकाऱयांची बैठक घेतली. डॉक्टर्सच्या तज्ञ समितीबरोबरही त्यांनी चर्चा केली.
रुग्णांनी उपचारासाठी लवकर यावे
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की कोरोना रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून गंभीर रूग्णांवर गोमेकॉत उपचार केले जातात तर अलक्षणिक रुग्णांना कोविड निगा केंद्रात पाठवले जाते. सर्वांना चांगले उपचार देण्यात येत असून कोणतीही हयगय केली जात नाही. त्यामुळे जनतेने भिती बाळगू नये. अनेक रुग्ण अनेक दिवस घरात काढतात आणि नंतर शेवटी हॉस्पिटलात येतात, तेव्हा त्यांना वाचवणे कठीण होत असल्याचे राणे यांनी नमूद केले आणि रूग्णांनी लवकर उपचारासाठी यावे असे आवाहन केले.
लोक मास्क वापरत नाही
कोरोना रुग्णांसाठी गोमेकॉत खास वॉर्ड करण्यात आले असून तेथे रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. लोक मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर पाळत नाहीत म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे
कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. सर्व डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्ग, आरोग्य खाते कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र झटत आहेत असे राणे म्हणाले.
गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी गोमेकॉ हॉस्पिटल, मडगावचे इएसआय हॉस्पिटलमधील आकडेवारी सादर केली. कोरोना रुग्णांना किमान 15 दिवस तरी बेडवर ठेवावे लागते. त्यामुळे काहीवेळा ‘बेड’ फुल होतात आणि काही रुग्णांना ते मिळत नाहीत असा खुलासा डॉ. बांदेकर यांनी केला.
गोमेकॉतील 145 वॉर्डात 33, 146 – 21, 147 – 33, 148 – 42, 115 – 34, 132 – 10 व 122 – 12, असे 186 रुग्ण असल्याचे सांगितले तर मडगाव ईएसआय हॉस्पिटलात 210 व फोंडा हॉस्पिटलमध्ये 60 रुग्ण असल्याची माहिती, तेथे मृत्यू झालेल्यांची संख्या, कारणे यांचाही तपशील त्यांनी दिला.