सांगली कोल्हापूर रोड वरील हातकणंगले जवळील घटना, तरुण भारत मधील वृत्तानंतर प्रशासनाला जाग
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हातकणंगले जवळील कोविड सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. तरुण भारत मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रसासन हडबडून जागे झाले. संबंधित एजन्सीला साहित्य नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कोरोना रुग्णांसाठी हातकणंगले जवळील एका सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी दररोज शंभर ते दीडशे रुग्णांवर उपचार केले जातात. पॉझिटिव्ह रुग्णांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येते. शासनाकडून त्यांना जेवण चहा नाष्टा यासह औषध पुरवठा व अन्य साहित्य मोफत दिली जाते. ठेकेदाराकडून पॉझिटिव्ह रुग्णांना जेवण चहा नाष्टा पुरवला जातो. यासाठी फायबरचे साहित्य वापरले जाते. रुग्णांनी जेवण केल्यानंतर हे साहित्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. परंतू ठेकेदाराकडून योग्य दक्षता घेण्यात आली नाही. रुग्णांनी हाताळलेले साहित्य सांगली कोल्हापुर रोड जुन्या बायपास रस्त्यावर उघड्या वरती टाकून देण्यात येते. त्याचा नाहक त्रास महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना होत होता. त्यामुळे संताप व्यक्त होत होता. तरीही हा प्रकार थांबला नाही. सोमवारी तरुण भारत ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले यानंतर प्रशासन हडबडून जागे झाले. संबंधित एजन्सीला खडे बोल सुनावले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांना साहित्य नष्ट करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी जेसीबीच्या साह्याने या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्या मुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.