प्रतिनिधी/ पणजी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोरोना रुग्णासोबत इस्पितळात एका नातेवाईकाला ठेवण्याची व्यवस्था मडगाव येथील कोविड इस्पितळात करण्यात येणार आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी दिलेल्या निवाडय़ानुसार कोविड इस्पितळात भरती केलेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकाला त्याची इच्छा असल्यास सोबत ठेवण्याची व्यवस्था करावी, असा आदेश दिला आहे. सदर नातेवाईकाला ठेवले जाईल, पण त्या रुग्णाच्या बाजूला ठेवले जाणार नाही. इस्पितळातच वेगळ्या ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाची बाधा झालेल्या पण कोणतीच लक्षणे नसलेल्या रुग्णाला 10 दिवसांनंतर कोविड चांचणी न करता घरी पाठविण्यात येईल. मात्र त्याने 7 दिवस होम कोरंटाईन झाले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कोविड इस्पितळाला भेट देऊन तेथील कारभाराची पाहणी करून योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार समिती स्थापन केली जाईल. तसेच सीसीटीव्ही पॅमेरे बसवले जाणार आहेत, असे त्या म्हणाल्या.
कोरोना रुग्णांची संख्या 625
दरम्यान, आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 625 एवढी झाली आहे. 11 जणांना बरे झाल्यमुळे घरी पाठविण्यात आले. अजून 21 जणांना संशयित म्हणून विलगिकरणात ठेवण्यात आले आहेत. तर होम कोरंटाईनमध्ये 240 जण असल्याची माहिती देण्यात आली.
आतापर्यंत गोव्यातून 60 श्रमिक स्पेशल ट्रेन 1 लाख 34 हजार कामगारांना घेऊन विविध राज्यात गेल्या आहेत. तर 31 हजार 214 लोक गोव्यात आल्याचे त्यांना सांगितले.