प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या दुसऱया लाटेत बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईनची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारले आहे. या सेंटरला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली.
या हेल्पलाईन सेंटरमध्ये कशाप्रकारे काम सुरु आहे, याची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजीत चव्हाण, युवकचे अमित जाधव उपस्थित होते. हे सेंटर जिह्यातील कोरोना रुग्णांना मदत तर करत आहे. त्याचबरोबर इतर जिह्यातील रुग्णांनासुद्धा बेड मिळविण्यासाठी मदत करत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी धावाधाव करीत आहेत. रुग्णांना मदत व्हावी, वेळेत उपचार सुरु व्हावेत, यासाठी युवक काँग्रेसने देशभर हेल्पलाईन सेंटर सुरु केली आहेत. त्याच धर्तीवर प्रदेश युवक काँग्रेसनेसुद्धा राज्यात प्रत्येक जिह्यात हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली या सेंटरचे काम नियोजनपूर्वक चालले आहे. या सेंटरमध्ये ज्यांचे मदतीसाठी फोन येत आहेत, त्यांच्या रुग्णांची उपयुक्त पुरेशी माहिती घेतली जात आहे. त्यांना हवी असणारी योग्य ती मदत युवक काँग्रेसची टीम करत आहे.
शिवराज मोरे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. या प्रत्येक हेल्पलाईन सेंटरमध्ये पूर्णवेळ स्वयंसेवक बसून कोरोना रूग्णांना मदत करीत आहेत. गेल्या पाच दिवसात 100 हुन अधिक रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध केले आहेत. रेमडेसिव्हर इंजेक्शनसुद्धा अनेकांना उपलब्ध केले आहेत. ऑक्सिजन मशीन दिली जात आहे. सेंटरची टीम आरोग्य विभाग व डॉक्टर यांच्या संपर्कात असून प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करीत आहे.