प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात वेगाने फैलावत जाणारा कोरोना रोखण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गोव्यात दिल्ली मॉडेल राबविणार असून प्रत्येक घराघरात जाऊन जागृती केली जाईल. ऑक्सिमीटरद्वारे प्राणवायुचे मापन करून सल्ला दिला जाईल. आवश्यक असल्यास वैद्यकीय सुविधाही दिल्या जातील, अशी माहिती आपचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी पत्रकारांना दिली.
‘गोवन्स अगेन्स्ट कोरोना’ या मोहिमेचा शुभारंभ करताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सुरेश तिळवे, राहुल म्हांबरे तसेच सुनिल सिग्नापूरकर उपस्थित होते. प्रत्येकाचा प्राणवायू तपासण्यासाठी आपचे 400 कार्यकर्ते तैनात असून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डेंटल मेडिकल असोसिएशन या संघटनेतील डॉक्टरांची मदत घेतली जाणार असल्याचे गोम्स यांनी सांगितले.
अनेक आजार उघडकीस
यापूर्वी पणजी, शिवोली, बाणावली, साळगाव अशा अनेक ठिकाणी ऑक्सिमीटरच्या साहाय्याने प्राणवायू तपासण्यात आला. रुग्णाला कोरोनाची कुठलीच लक्षणे आढळत नसली तरी प्राणवायू कमी आढळल्यास कोरोनाची लागण झाल्याची शक्यता अधिक असते. या चाचणीत अनेकांना उपचारासाठी न्यावे लागले, असे सांगताना अनेकांची प्राणवायू पातळी कमी होती पण त्यांना कोरोना नसलातरी इतर घातक आजार जडल्याचे उघड झाले. असा आजार त्यांना होता याची त्यांना कल्पनाही नव्हती पण आपच्या या ऑक्सिमीटर चाचणी मोहिमेमुळे कोरोनाग्रस्तांवर लवकरच आणि योग्य उपचार तर झालेच इतर आजार वेळेत उघडकीस आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे गोम्स म्हणाले.
ऑक्सिमीटर मोफत
दिल्ली सरकारने प्रत्येक घरात ऑक्सिमीटर दिला आहे. गोवा सरकारने तसे करायला हवे होते. पण आपचे कार्यकर्ते असा ऑक्सिमीटर फक्त कोरोना रुग्णांना देणार आहेत. मात्र त्यांनी काम झाल्यावर ते परत करायचे असून इतर रुग्णांनाही त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
‘भिवपाची गरज आसा’
घाबरण्याची गरज नाही, असा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी दिला. पण सध्या अशी परिस्थिती उद्भवली आहे की घाबरण्याची खरोखरच गरज आहे. सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे, अशावेळी सर्व राजकीय पक्ष, एन.जी.ओ., संघटना यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या भ्रष्टाचारावर नंतर मोहीम उघडणार
गोव्यात कोरोनाच्या नावाने व्यापारीकरण चालले आहे. खासगी इस्पितळात लूटमार चालू असून त्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे. गोमेकॉत जी उपकरणे घेतली, वेंटीलेटर व खाटी घेतल्या त्यात झालेला भ्रष्टाचारही उघड करायचा आहे. पण सध्या लोकांचे प्राण वाचवणे आणि कोरोना फैलावण्यापासून रोखणे ही मोहीम प्रथम राबवणी जाणार असून सध्या कोणतेच राजकारण नसल्याचे गोम्स म्हणाले.
मोहिमेला जनतेने सहकार्य करावे : गोम्स
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मदत करतात म्हणून ती मदत घ्यायची नाही, असे करून नये. चाचणीची कोणावरही सक्ती नाही. सर्व नियम पाळूनच चाचणी केली जाईल. कृपया आपच्या या मोहिमेवर राजकारण केले जाऊ नये, असे सांगून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी गोम्स यांनी केले.